Mon, Sep 16, 2019 12:02होमपेज › Marathwada › 14 हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वे पूर्ण  

14 हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वे पूर्ण  

Published On: Dec 31 2018 2:00AM | Last Updated: Dec 31 2018 2:00AM
पाथरी : सुधाकर गोंगे

प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये प्राप्त 17 हजार 886 प्रस्तावांपैकी 14 हजार 360 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर 8 हजार 369 लाभार्थ्यांची आधार नंबर ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. 

शासनाने प्रधामंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या गरजू लाभार्थ्यांसाठी ‘ड’ फॉर्म भरून घेण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत प्रस्ताव मागवले होते. ग्रामसभेने मान्यता दिलेल्या प्रस्तावांची पुर्तता करून पंचायत समिती स्तरावर याद्या तयार करण्यात आल्या होत्या. शासनाने सप्टेंबर महिन्यात गावनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी पथके तयार केली होती.

पाथरी तालुक्यात 49 ग्रा.पं.मध्ये आवास घरकुल योजनेसाठी 17 हजार 886 लाभार्थ्यांची नावे होती. गावनिहाय सर्वेक्षणासाठी सुरुवातीला शासनाने 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. त्यावेळी 8 हजार 500 लाभार्थ्यांची नावे अपलोड करण्यात आली होती. गावात प्रत्येक लाभार्थ्याच्या घरात जाऊन फोटो जिओ टॅगिंग करण्यात नेटवर्कमुळे अडचणी येत असल्याने संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. 

शासनाने ही बाब लक्षात घेता सर्वेक्षणासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. या काळात तालुक्यातील14 हजार 360 लाभार्थ्यांच्या नावाचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. 8 हजार  369 कुटुंबाची आधार एन्ट्री करण्यात आली आहे. लाभार्थ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन अपलोड करण्यात आल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याचे आधारकार्ड ऑनलाइन एन्ट्री करण्यात येत आहेत.

लाभार्थीं मात्र घरकूल मिळण्याच्या प्रतिक्षेत

प्रधानमंत्री आवास घरकूल योजना अंतर्गत ‘ड’ फॉर्म भरल्यानंतर त्याचे सर्वेक्षण सुरू असताना घरकूल मंजूर झाल्याची गावोगावी चर्चा सुरू झाली. आता घरकूल मिळण्याची लाभार्थ्यांना प्रतिक्षा आहे. मात्र अद्याप याद्यांचे काम  पूर्ण झाले नाही. याद्या अंतिम होऊन पुन्हा प्रतीक्षा याद्यांची निवड ही मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे घरकूल कोणाला मिळेल? हे  प्रतीक्षा यादी अंतिम झाल्यावरच कळणार आहे.