Thu, Oct 17, 2019 14:13



होमपेज › Marathwada › खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा 

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा 

Published On: Sep 15 2019 10:31PM | Last Updated: Sep 17 2019 1:54AM




उस्मानाबाद : प्रतिनिधी 

शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य ५ जणांवर फसवणुकीचा व शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

 उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने १२ एप्रिल २०१९ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांने आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जप्त केलेल्या चिट्टीत त्याने तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी वसंतदादा सहकारी बँकेकडे २०१० या साली कर्ज घेतले होते. यासाठी ढवळे यांची जमीन गहान ठेवली होती. मात्र, कारखाण्याने पैसे न भरल्याने ते तणावाखाली होते. यातूनच त्‍यांनी तणावातून तसेच दुष्काळामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. त्यांनतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तब्बल ५ महिने तपास केल्यांनतर गुन्हा नोंद केला आहे. 

तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती, कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांच्या जमिन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी ढवळे यांच्या खिशात २ वेगवेळ्या चिट्ठ्या सापडल्या त्यातील एका चिट्ठीत त्यांनी आत्महत्येस ओम राजे निंबाळकर व वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख होता, तर दुसऱ्या चिट्ठीत १३ शेतकऱ्यांनी तेरणा कारखान्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट झाली नाही असे सांगत व्यथा मांडल्या आहेत.