Mon, Jun 01, 2020 18:42
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांची पळवापळवी?

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांची पळवापळवी?

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 03 2018 10:59PMबीड : उत्तम हजारे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 10 फेब्रुवारी रोजी बीडच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यासाठी शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे आणि राष्ट्रवादीपासून दुरावलेले आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यात स्पर्धा लागली आहे. दोघांनीही स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले असून, कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आज रविवारी बैठका होत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. विनायक मेटे आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांनी वेळ मागितली होती. आ. मेटे हे भाजपच्या मित्रपक्षाचे नेते आहेत, तर आ. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीपासून दुरावलेले आहेत. मध्यंतरी फडणवीस यांनी बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या निवासस्थानी चहापान घेतले होते. क्षीरसागर यांची वाटचाल भाजप प्रवेशाच्या दिशेने चालू असून, मुख्यमंत्री फ डणवीस यांनी मेटे-क्षीरसागर यांना कार्यक्रमासाठी स्वतंत्र वेळ दिली आहे. मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आपणास जास्त वेळ द्यावा, यासाठी दोन्ही नेते आपले वजन वापरत असून, कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्‍तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न होत आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी आ. क्षीरसागर यांनी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक आज रविवारी सकाळी बोलावली आहे. बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आ. मेटे यांच्याकडून आयोजित कार्यक्रम

आ. विनायक मेटे यांनी नारायणगड येेथे 25 कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांचे उद्घाटन, बीड पंचायत समितीच्या पाच कोटी रुपयांच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

आ. क्षीरसागर यांच्याकडून आयोजित कार्यक्रम

बीड नगरपालिकेसाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचे उद्घाटन, मल्टिपर्पज ग्राऊंडचे लोकार्पण व या ठिकाणी उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण. याबरोबरच पालिकेतील सभागृहाला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव देण्याचा कार्यक्रम होणार आहे. 

पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा

बीड जिल्हा पत्रकार संघाने यावर्षीचा स. मा. गर्गे पत्रकारिता पुरस्कार  ‘आप की अदालत’ फेम  पत्रकार रजत शर्मा यांना जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरणही  10 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

पंकजा मुंडे यांचे बेरजेचे राजकारण

बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमांचे आयोजक आ. विनायक मेटे आणि आ. जयदत्त क्षीरसागर हे आहेत. या दोन्ही नेत्यांशी पंकजा मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या माध्यमातून त्या बेरजेचे राजकारण करत आहेत.

भाजप आमदारांत अस्वस्थता

मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हे शिवसंग्राम व राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.  मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर आष्टीचे भाजपा आ. भीमराव धोंडे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. आष्टी तालुक्यातील विविध प्रश्‍नांसंदर्भात आ. धोंडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे समजते.