Sat, Sep 21, 2019 07:08होमपेज › Marathwada › जमिनीतून निघाला उकळत्या रसायनासारखा द्रव(video)

जमिनीतून निघाला उकळत्या रसायनासारखा द्रव

Published On: Jun 13 2019 11:47AM | Last Updated: Jun 13 2019 1:09PM
गेवराई : प्रतिनिधी

जमिनीतून उकळत्या रसायनासारखा काळा द्रव निघत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हा लाव्हारस तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. हा प्रकार गेवराई तालुक्यातील पोखरी येथे बुधवारी रात्री उशिरा निदर्शनास आला असून माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.याबाबत तहसील प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोखरी येथे जावून पाहणी केली आहे. दरम्यान मागील काही दिवसापूर्वीच परळी तालुक्यात देखील असाच प्रकार निदर्शनास आला होता.

गेवराई तालुक्यातील पोखरी येथे मधुकर मोघे यांच्या शेतात उकळत्या रसायनासारखा काळा द्रव निघत असल्याचे बुधवारी रात्री ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. हा द्रव मोठ्या प्रमाणावर जमिनीतून बाहेर पडत असल्याने परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बघता -बघता याठिकाणी लोकांची मोठी गर्दी झाली होती. तर जमिनीतून लाव्हारस निघत असल्याचे चर्चा जोर धरत असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या दरम्यान हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत अद्याप दुजोरा मिळाला नसून याची माहिती तहसील प्रशासनाला सरपच बबन मोघे यांनी दिली. यानंतर नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे, मंडळ अधिकारी जे.एस.साळुंके, तलाठी डि. ए. शेळके, ओव्हाळ यांनी भेट दिली असून घटनास्थळाची पाहणी केली आहे.

जाणकारांची माहिती

पोखरी येथील मधुकर मोघे यांच्या शेतात मादळमोही येथील ३३ केव्ही केंद्रातून मेन लाईन गेलेली आहे. दरम्यान या ठिकाणी लोखंडी खांब असून यालगतच हा काळा उकळता द्रव निघत आहे. त्यामुळे मेन लाईनचा विद्युत प्रवाह या पोलमध्ये उतरुन एखादा दगड वितळला असण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे.