Fri, Jun 05, 2020 00:11होमपेज › Marathwada › रेल्वेस वर्षाकाठी ८०० कोटी उत्पन्न देणार्‍या परळी स्थानकास सापत्न वागणूक

रेल्वेस वर्षाकाठी ८०० कोटी उत्पन्न देणार्‍या परळी स्थानकास सापत्न वागणूक

Published On: Jun 16 2019 1:47AM | Last Updated: Jun 15 2019 9:12PM
बीड : उत्तम हजारे

रेल्वे विभागास वर्षाकाठी 800 कोटींचे उत्पन्न देणार्‍या परळी रेल्वेस्थानकास सिकंदराबाद रेल्वे विभागाकडून सापत्न वागणूक मिळत असून हा विभाग या भागातील प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरला आहे. सिकंदराबाद विभागाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने परळी रेल्वेस्थानक नांदेड विभागात जोडण्यात यावे, यासाठी बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतम मुंडे यांनी येत्या संसदीय अधिवेशनात प्रस्ताव मांडावा, अशी मागणी जोर धरत आहे.

मराठवाड्यात ब्रॉडगेज रेल्वे लाईन सर्वप्रथम परळीस आली. परळी  12 पैकी एक ज्योतिर्लिंगाचे स्थान असून याठिकाणी वीज निर्मितीचे आठ संच आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा आणण्यासाठी याठिकाणी ब्रॉडगेज लाईन टाकण्यात आली. त्यावेळी रेल्वेचा नांदेड विभाग अस्तित्वात नव्हता. सर्व कामकाज सिकंदराबाद विभाग सांभाळत असे. कालांतराने रेल्वेची व्याप्ती वाढल्याने मराठवाड्यातील सर्व रेल्वेस्थानके मीटरगेजवरून ब्रॉडगेज करण्यात आली. रेल्वेची जशी व्याप्ती वाढली तसे सिकंदराबाद विभागाचे दोन भाग करण्यात येऊन नांदेड हा विभाग नव्याने कार्यान्वित करण्यात आला.

परळीस वीज निर्मितीचे आठ संच आहेत. त्या वीज केंद्रांना लागणारा कोळसा ऑईल किंवा अवजड मशिनरी रेल्वेने आणल्या जातात. बीड जिल्ह्यात परळी वगळता कुठेच रेल्वेस्थानक नसल्याकारणाने बीड जिल्ह्यात लागणारी खते, बी-बियाणे आदींची साठवणूक परळी डेपोत करावी लागते. या वस्तू परळीस रेल्वेने आणण्यात येऊन याठिकाणाहून बीड जिल्ह्यात अन्य ठिकाणी वाहतुकीद्वारे पाठवल्या जातात. यातून रेल्वेच्या सिकंदराबाद विभागास परळी रेल्वेस्थानकाकडून जवळपास आठशे कोटींचे उत्पन्न वर्षाकाठी मिळते.

परळीपासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर उखळी रेल्वेस्थानकापर्यंत नांदेड विभाग आहे. परळीपासून उदगीर रेल्वेस्थानक सिकंदराबाद विभागाच्या कार्यक्षेत्रात आहे. परळीपासून नांदेड विभाग केवळ 110 किलोमीटर अंतरावर आहे, तर सिकंदराबाद विभाग हा परळीपासून जवळपास 350 किलोमीटर अंतरावर आहे. सिकंदराबाद विभाग परळीकडे उत्पन्नाच्या द‍ृष्टीने पाहतो. मात्र, या प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परळी रेल्वेस्थानकाची अवस्था म्हणजे ‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का’ अशी झाली आहे. परळीहून मुंबई गाडी सुरू करावी, अशी मागणी बर्‍याच वर्षांपासून आहे. सकाळी सातनंतर परळीहून परभणीकडे जाण्यासाठी दुपारी दीडशिवाय रेल्वे नाही. तेव्हा परळी-पूर्णा अशी गाडी सुरू करण्यात यावी, परळी -लातूर गाडी सुरू करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.