Sun, Jun 07, 2020 08:43होमपेज › Marathwada › 'बीडचे पोलिस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागतात'

'बीडचे पोलिस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागतात'

Published On: Mar 25 2019 7:48PM | Last Updated: Mar 25 2019 8:53PM
बीड : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधीक्षक सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत आहेत, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादीला सभेची परवानगी नाकारण्यात आल्याची टीकाही त्यांनी  केली.

बीड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि प्रशासन दबावात असल्याने निवडणूक निर्भयपणे पार पडेल की नाही अशी शंका उपस्थित केली. यावेळी माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, युवक नेते संदीप क्षीरसागर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पापा मोदी, समता परिषद जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत आदी उपस्थित होते.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी आम्ही रॅली आणि सभेची परवानगी मागितली. तशी परवानी दिली देखील आणि नंतर ऐनवेळी सभेची परवानगी नाकारण्यात आल्याचे मुंडे  यांनी सांगितले. भाजपच्या लोकांनी दबाव आणल्याने राष्ट्रवादीला मैदान उपलब्ध होऊ दिले नाही असे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा उमेदवारी अर्ज २५ मार्चला भव्य रॅलीसह दाखल करणार आहोत असे निवेदन देऊन त्याबाबत प्रशासनाकडून परवानगी मिळवली होती. मात्र भाजपच्या उमेदवारालाही त्याच वेळी याच रस्त्यावरून रॅलीला परवानगी कशी दिली गेली? एका पक्षाला रॅलीसाठी परवानगी दिली असताना, दुसऱ्या पक्षाला परवानगी देणं हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र तरीही दबावाखाली येऊन परवानगी देण्यात आली. निवडणुकींच्या काळात वारंवार अशी दडपशाही होऊ नये यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांसह, जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.