Sat, Oct 19, 2019 10:54होमपेज › Marathwada › सांगली प्रकरणामुळे पोलिस खाक्याला लगाम!

सांगली प्रकरणामुळे पोलिस खाक्याला लगाम!

Published On: Dec 05 2017 6:22AM | Last Updated: Dec 05 2017 6:22AM

बुकमार्क करा


बीड : शिरीष शिंदे

सराईत गुन्हेगार व नवीन आरोपींना एखाद्या गुन्ह्यात पकडल्यानंतर  त्याची कसून चौकशी करून गरज पडल्यास थर्ड डिग्रीचा वापर केला जातो. परंतु, सांगली पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाला झाल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे आरोपींना मारहाण करण्याबाबत पोलिसांची भूमिका सौम्य झाली असल्याची उदाहरणे समोर येत आहे.

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांनी चोरीतील संशयिताला चौकशीच्या नावाखाली उलटे टांगून थर्ड डिग्रीचा वापर करून त्याचा खून केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह पेट्रोल आणि डिझेल ओतून जाळण्यात आला. सहाजणांना अटक करून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस आता काळजी घेऊ लागल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. कोणत्याही आरोपीला नेताना त्याची पोलिस डायरीला नोंद, आवश्यक असल्यास हथकडी अशा गोष्टीं प्राधान्याने पार पाडल्या जात आहेत. आरोपी संदर्भात आपल्यावर कारवाई होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, अधिकारी स्वतः कर्मचार्‍यांची बैठक घेऊन आरोपींवर कारवाई करताना काय उपाय योजना कराव्यात याची माहिती आपल्या पूर्वानुभवासह सांगत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांना केली धक्‍काबुक्‍की
एरवी राज्य राखीव दलाचे पोलिस येताच स्वरीत परिस्थिती नियंत्रणास येण्यास सुरुवात होते. आता परिस्थिती बदलत असल्याचे काही घटनांवरून समोर येऊ लागले आहे. बीड जिल्हा रुग्णालयात राखीव दलाच्या जवानांना सराईत असलेल्या आरोपीने धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. पोलिस त्याची समजूत काढत होते तर तो पोलिसांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसून आले होते.

मानव अधिकाराचीही धास्ती
सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये, कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस दलाकडून वेळोवेळी पेट्रोलिंग, शहरात पथसंचलन यासह विविध प्रयोग करून समाजकंठकावर दहशत निर्माण केली जाते तर आरोपींची पीसीआरमध्ये कसून चौकशी केली जाते. आता कायद्याची माहिती आरोपींना झाली आहे तर काही आरोपी पोलिसांविरोधात मानवी हक्‍क संघटनेकडे दाद मागतात. अधिकारी व कर्मचार्‍यांची तक्रार आल्यावर त्यांची चौकशी होती. हा ताप डोक्याला नको म्हणून पोलिस आता नमती भूमिका घेत असल्याचे समोर येत आहे.