Sun, May 31, 2020 02:55होमपेज › Marathwada › बीडच्या नेत्यांना राजकीय पुनर्वसनाची प्रतीक्षा

बीडच्या नेत्यांना राजकीय पुनर्वसनाची प्रतीक्षा

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:45AMबीड ः उत्तम हजारे


बदलत्या राजकीय घटनांची चटकन नोंद घेणारा जिल्हा म्हणून बीड जिल्हा राज्यभर ओळखला जातो. राज्य पातळीवर घडणार्‍या घटनांचे त्वरित बीड जिल्ह्यात पडसाद उमटलेले दिसतात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान बीड जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली होती. सर्वच पक्षाचे नेते निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत असताना बीड जिल्ह्यात मात्र काही नेत्यांचे पक्षांतर व काहीचे राजकीय पुनर्वसन झाल्यानंतरच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवलेले आष्टीचे माजी मंत्री सुरेश धस सध्या भाजपच्या कळपात आहेत. भाजपमध्ये त्यांचा अद्याप अधिकृत प्रवेश झाला नसला तरी, बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपाकडून ते प्रमुख दावेदार आहेत. सुरेश धस यांच्या राजकीय दिशा स्पष्ट झाल्यानंतर आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदललेली असतील.

शिवसेनाआणि भाजप प्रवेशाची चाचपणी सध्या ते करीत आहेत. केज, अंबाजोगाई तालुक्यात त्यांच्या भूमिकेवर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.

 शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अद्याप अधुरे आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेले आ. मेटे यांनी 2014 साली भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. कमी मताने त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मेटे यांनी चांगली तयारी केली आहे. शेवटच्या टप्प्यात का होईना मंत्रीपद मिळावे, अशी मेटे यांची भाजपकडे मागणी आहे. बीड जिल्ह्यातील काही नेतेच मंत्रीपदासाठी खोडा घालत आहेत, याची जाणीवही मेटेंना आहे. मेटे पुन्हा जनमताचा कौल घेणार आहेत.

 बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे पुतण्याच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीपासून दूर फे कले गेले आहेत. आ. जयदत्त क्षीरसागर, बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची भाजपशी जवळीकता वाढली आहे. क्षीरसागर यांच्या भूमिकेवर अनेक राजकीय उलाथापालथी होणार आहेत. शिवसेनेने जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा युवा नेत्यांच्या हाती दिली. 

सध्या काँग्रेसमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मागे जाणे टाळले आहे. प्रा. नवले हे शेवटची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवतात. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाच्या संपर्कात प्रा. नवले असून तिकिटाची खात्री मिळाल्यास त्यांचे पक्षांतर अटळ आहे. केज मतदारसंघातील ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हेही राष्ट्रवादीपासून दुरावल्यानंतर त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे.