Mon, Dec 16, 2019 10:53होमपेज › Marathwada › बीड : सोनाजीराव रांजवण पाटील यांचे निधन 

बीड : सोनाजीराव रांजवण पाटील यांचे निधन 

Last Updated: Oct 22 2019 1:56PM

डॉ. सोनाजीराव गंगारामजी रांजवण पाटीलमाजलगाव (बीड) : प्रतिनिधी 

बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सोनाजीराव गंगारामजी रांजवण पाटील यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉ. सोनाजीराव रांजवण यांनी १९६७ साली आपल्या वैद्यकीय व्यवसायाची कार्यारंभ ग्रामीण रुग्णालय तालखेड येथून केला होता. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले. तालखेड जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडून येत १९७९ ते १९९० असा सलग १२ वर्षाचा कार्यकाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून भुषवला. त्यांनी माजलगावच्या शैक्षणिक सामाजिक, सहकार क्षेत्राची पायाभरणी केली. सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली. माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही ते होते. जिल्हा परिषद, शिक्षण संस्था, साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी नोकरीस लावून त्यांचे संसार उभे करण्याचं काम सोनाजीबापू यांनी केलं.

त्यांचं हेच काम पुढे त्यांच्या हयातीत असतांना त्यांचे पुत्र 'कार्यारंभ'चे संपादक शिवाजीराव रांजवण आणि सिंदफना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रतापराव रांजवण यांनी सुरु ठेवत शुभमंगल मल्टिस्टेट, विश्वेष अर्बन बॅकांची स्थापना केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दैनिक कार्यारंभचीही स्थापना झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे, जावाई, नात जावई असा परिवार आहे.