Mon, Jun 01, 2020 17:26
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › जायकवाडीच्या पाण्याने भागणार बीडची 'तहान'

जायकवाडीच्या पाण्याने भागणार बीडची 'तहान'

Published On: Aug 09 2019 2:20PM | Last Updated: Aug 09 2019 1:58PM

जायकवाडी धरणाचा संग्रहीत फोटो.बीड : प्रतिनिधी

जायकवाडी धरणाची पाणी पातळी 67%पर्यंत पोहचली आहे. त्‍यामुळे हे पाणी पैठण उजव्या कालव्यातुन माजलगाव धरणात तत्काळ सोडल्यास बीडसह 11 गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी आग्रही मागणी जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार येत्या दोन दिवसात अडीच टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन क्षीरसागर बंधूंच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला.

बीड शहराला बिंदुसरा आणि माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र दोन्ही धरणाची पाणी पातळी मृत साठ्यात गेली.  त्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. आता नाशिक व परिसरात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी 67% ने वाढली आहे. पैठणच्या उजव्या कालव्यातून 3 टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडले तर बीडसह 11 खेड्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो, हे पाणी तत्काळ सोडावे अशी आग्रही मागणी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.  

जायकवाडीतून अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाचे अधिकारी कोहिरकर यांना दिले. यामुळे आता बीडसह ग्रामीण भागातील 11 गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. दोन दिवसात पैठणच्या उजव्या कालव्यातून हे पाणी माजलगाव धरणात सोडण्याची प्रक्रिया होणार असल्याचे जायकवाडी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक कोहिरकर यांनी सांगितले.