Sat, Oct 19, 2019 09:56होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : स्वबळाची वेळ आलीच तर...भाजप आहे तयार! 

उस्मानाबाद : स्वबळाची वेळ आलीच तर...भाजप आहे तयार! 

Published On: Aug 06 2018 10:27AM | Last Updated: Aug 06 2018 10:27AMउस्मानाबाद : भीमाशंकर वाघमारे

लोकसभा निवडणुकीला 6-7 महिन्यांचा कालावधी उरला असल्याने आता सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यातून विस्तवही आडवा जात नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच ऐनवेळी धावपळ नको म्हणून भाजपने स्वबळाच्या तयारीने वाटचाल सुरू ठेवली आहे.

गेल्या काही दिवसांतील घटना घडामोडींवरून याचे प्रत्यंतर सातत्याने येऊ लागले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या शिवसेनेकडे आहे. प्रा. रवी गायकवाड हे खासदार म्हणून किती यशस्वी व अपयशी ठरले याच्या प्रचारतोफा विरोधकाकंडून धडाडणार आहेत. या तोफांना उत्तर देण्यास शिवसेना धडाडीने पुढे येणार असली तरी त्यांना भाजपची साथ असणार की नाही, हे युतीच्या निर्णयावरच अवलंबून असेल.

शिवसेनेची गेल्या काही दिवसांतील भूमिका ही एकला चलो रेची आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पडसाद उमटल्यास शिवसेनेकडून इच्छुकांची मांदियाळी आहे. समस्या निर्माण होऊ शकते ती भाजपला. त्यामुळेच भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. निलंगा येथील (जि. लातूर) भाजप नेत्या व माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांचे नाव भाजपकडून चर्चे त आहे. शिवाय आ. सुजितसिंह ठाकूर यांनीही मध्यंतरी जाहीर कार्यक्रमात बोलताना मी ही उमेदवार असू शकतो, असे वक्‍तव्य केले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती देणे, सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा प्रश्‍न रेल्वेमंत्र्यांसमोर मांडणे, उस्मानाबादेतील प्रस्तावीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्यानंतर त्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविणे यांसह भाजपने आखलेली आक्रमक रणनीती पाहता लोकसभेत ऐनवेळी समस्या नको, यादृष्टीने भाजपने तयारी चालविली असल्याचे जाणवू लागले आहे.

गेल्या चार वर्षांत कधीच आक्रमक नसलेल्या भाजपचे बदलते धोरण विरोधी पक्ष राष्ट्रवादीलाही आव्हान म्हणूनच पाहावे लागणार आहे. पक्षाने लोकसभेचा अधिकृत चेहरा म्हणून सध्या तरी कोणास पुढे केले नसले तरी आ. ठाकूर यांचे नाव लोकसभेसाठी चर्चे त राहील, याची दक्षता पक्षाने घेतल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. आ. ठाकूर यांचे भाजपच्या केंद्रीय वर्तुळाशी जवळीक आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच अनेक केंद्रीय नेत्यांशीही घनिष्ट संबंध आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपने लोकसभेच्या दृष्टीने आक्रमक पावले टाकण्यात आघाडी घेतली आहे.