Thu, Jun 04, 2020 12:35होमपेज › Marathwada › औंढा, वसमतच्या दुष्काळावर लवकरच निर्णय

औंढा, वसमतच्या दुष्काळावर लवकरच निर्णय

Published On: Dec 25 2018 2:04AM | Last Updated: Dec 25 2018 1:47AM
हिंगोली : प्रतिनिधी

राज्य शासनाने यापूर्वीच जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुक्याचा दुष्काळी तालुक्याचा समावेश केला आहे. उर्वरित औंढा नागनाथ व वसमत या दोन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लवकरच चंद्रकांत पाटील यांच्या उपसमितीमार्फत दोन्ही तालुक्यांच्या दुष्काळाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी (दि.24) पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री कांबळे यांनी टंचाई उपाय योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, भाजपा नेते शिवाजी जाधव, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक गणेश बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना.कांबळे यांनी सांगितले की, टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकाही टँकरची मागणी नाही. मात्र जानेवारीपासून अनेक गावांतून टँकरची मागणी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून 264 टँकरची तयारी ठेवण्यात आली आहे. तसेच 1953 विहिरी व बोअर अधिग्रहण केले जाणार आहे. 

जिल्ह्यात सध्या 881 रोजगार हमीची कामे सुरू आहेत. या कामांवर 10 हजार 285 मजूर कार्यरत आहे. मजुरांची संख्या वाढल्यास 3 हजार 992 कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहे. यातून 12 लाख 29 हजार 368 लोकांना रोजगार देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील गावांमध्ये सर्वेक्षणाच्या वेळी असलेली स्थिती व आताची स्थिती यात मोठी तफावत आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यामार्फत विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात आला आहे. 

तो प्रस्ताव मंत्रालयात दाखल होताच, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उपसमितीत दुष्काळाबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही ना.कांबळे यांनी यावेळी बोलताना दिली.