Thu, Jun 04, 2020 21:48होमपेज › Marathwada › अटल बिहारींचे मराठी बोल परळीकरांच्या आजही आठवणीत

अटल बिहारींचे मराठी बोल परळीकरांच्या आजही आठवणीत

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMपरळी : रवींद्र जोशी

परळीकर राम राम... मला परळीला येताना खूप आनंद वाटला, असे म्हणताच झालेला टाळ्यांचा कडकडाट अन् एका क्षणात लाखोंच्या गर्दीला एकप्रकारे संमोहित करून टाकत आपल्या बोलण्यातून समरस करून टाकणार्‍या युगपुरुषाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेले असंख्य परळीकर आहेत. अटलजींच्या जाण्याने प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला असून अटलजींचे मराठी बोल परळीकरांच्या आजही आठवणीत आहेत. 

उत्तुंग व्यक्‍तिमत्त्व... सर्वसमावेशक नेतृत्व... अमोघ वक्तृत्वाचे धनी आणि भारताची आण्विक तटबंदी भक्कम करणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. वाजपेयींच्या निधनामुळे अवघा देश हळहळला असून त्यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील समन्वयी युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

दोन वेळा आले परळीला....

वाजपेयी हे दोन वेळा परळीत आले होते. सुरुवातीला जनसंघ बांधणीच्या निमित्ताने साधारण 1983 साली ते परळीत आले होते. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन हे त्यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर अटलजींचे विशेष प्रेम होते. परळीतील जनसंघ किंवा भाजपची जडणघडण महाजन-मुंडे या दोन नेतृत्वांच्या माध्यमातून झाली. या दोन्ही नेत्यांची कर्मभूमी परळी राहिल्याने भाजपच्या स्थापनेपासून ते आजतागायत शिर्षस्थ नेत्यांची ये-जा सुरूच असते. 1983 साली जि. प. शाळा परिसरात अटलजींची सभा झाली होती. त्यानंतर 1999 ला लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या होत्या त्यावेळी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर अटलजींची सभा झाली होती. 

माजी पंतप्रधान, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील थोर युगपुरुष हरपला असून देशाची फार मोठी हानी झाली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भाजपला देशात मोठे यश मिळवून देत पंतप्रधान पदासारख्या देशाच्या सवाच्च स्थानावर विराजमान केले. जनसंघ ते भाजपचे पहिले पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. तीन वेळा त्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषविले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते आदर्श होते. वाजपेयी हे हळव्या मनाचे कवी होते, त्यांच्या कवितांनी भारतीयांच्या मनामनांत राष्ट्राभिमान जागवला. त्यांच्या निधनाने भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता आज शोकसागरात बुडाला आहे.
: पंकजा मुंडे, पालकमंत्री,बीड

अटलजी जेव्हा 1999 ला परळीला सभेसाठी आले तेव्हा त्यांना सभास्थानी घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर होती. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, अशोक सामत व मी हेलिपॅडवर त्यांचे स्वागत केले होते. अटलजींंच्या प्रत्यक्ष भेटीचा  तो प्रसंग अविस्मरणीय आहे. 

: विकासराव डुबे, ज्येष्ठ भाजप नेते, परळी वैजनाथ 
1983 साली अटलजी परळीला आले होते. आम्हा युवकांना त्या काळात अटलजींचे भाषण, त्यांचा आवाज, विशिष्ट लकब याचे खूप मोठे आकर्षण होते. यातून अटलजींंच्या लकबीत त्यांच्या स्वागताची उद्घोषणा करण्याचे भाग्य मला लाभले. एक द्रष्टा नेता, युगपुरुष अटलजी आमच्या कधीच विस्मरणातून जाऊ शकत नाहीत.

: श्रीकांत मांडे, ज्येष्ठ नेते, परळी 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातल्या एका महान पर्वाचा अस्त झाला आहे. देशाचे लाडके, सर्वमान्य नेतृत्व आपण गमावले आहे. अटलजी राजकारणातील आदर्शपुरुष होते. सत्तारुढ व विरोधकांमधील समन्वयाने त्यांनी भारतीय राजकारणाला, लोकशाहीला उंची प्राप्त करून दिली, त्यांच्यासारखा सर्वमान्य नेता पुन्हा होणार नाही.
: धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अजात शत्रू व्यक्‍तिमत्त्व होते. ते राजकारणीच नव्हे तर एक उत्तम साहित्यिक आणि कवी मनाचे संवेदनशील नेते होते. भारतीय राजकारणात एक प्रगल्भ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते पंतप्रधान म्हणून एक श्रेष्ठ राजकारणी, साहित्यिक, कवी, लेखक अशा अनेक रूपांतून दिसत होते. त्यांच्या जाण्याने देशाचा कणखर आवाज हरपला आहे.
: जयदत्त क्षीरसागर, आमदार, बीड