Sun, Jun 07, 2020 13:41होमपेज › Marathwada › आष्टीच्या भूमिपुत्राचे केरळमध्ये बचावकार्य

आष्टीच्या भूमिपुत्राचे केरळमध्ये बचावकार्य

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:57AMआष्टी : सचिन रानडे

केरळमध्ये पावसाने हाहाकार घातला आहे. नागरिकांच्या घरादारात पाणी शिरल्याने अनेकांना घर सोडून छावणीत रहावे लागत आहे, तर तीनशेवर जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. या राज्यात पुराच्या पाण्याच्या आपत्तीत अडकलेल्यांना सैन्य दलातील जवान आपल्या जीवाची बाजी लावत वाचविण्याचे काम करीत आहेत. केरळीमधील नागरिकांना वाचविण्यासाठी  सैन्यदलातील हजारो जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या जवानात आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथीलही एक जवान आहे.

तालुक्यातील टाकळसिंग येथील प्रमोद जगताप हे पुणे येथील सैन्यदलाच्या इंजिनिअरिंगच्या तुकडीमध्ये कर्तव्यावर आहे. प्रमोद यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण टाकळसिंग येथे झाले आहे. यानंतर आष्टी येथे शिक्षण घेतले. प्रमोद   शाळेत असतानाच क्रिकेट आणि खो-खो खेळाचा खेळाडू आहे, मात्र देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची प्रबळ इच्छाशक्ती यामुळे त्यांनी वेळोवेळी आपली शरीरयष्टी सुदृढ ठेवण्याचे काम केले. यामुळेच त्यांची पुणे येथील बॉम्बे इजिनिअरिंगच्या तुकडीत निवड झाली. सध्या केरळमध्ये पावसामुळे नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. अनेकांचा या पाण्यामुळे जीव गेला आहे. त्यामुळे तेथे सैन्यदलाच्या विविध तुकडीचे जवान बचावकार्य करीत आहेत. या बचावकार्यासाठी प्रमोद जगताप हेही केरळमध्ये आपल्या सहकार्‍यांसह गेले आहे. आतापर्यंत आठशेवर जणांना प्रमोद यांच्या तुकडीने संकटातून बाहेर काढले आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासह इतर सेवाही देण्याचे काम हे जवान करीत आहेत.