Mon, Jun 01, 2020 17:40
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › वंचित आघाडीचा चव्हाण यांना फटका

वंचित आघाडीचा चव्हाण यांना फटका

Published On: Jun 01 2019 2:08AM | Last Updated: Jun 01 2019 2:08AM
विश्‍वास गुंडावार

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँगे्रसचे उमेदवार प्रदेशाध्यक्ष अशोक शंकरराव चव्हाण यांचा 40 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यामुळे चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात चव्हाण यांचा पराभव झाल्याने पुढील काळात जिल्ह्यातील राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रताप पाटील चिखलीकर यांना 4 लाख 81 लाख 148 मते मिळाली. अशोक चव्हाण यांना 4 लाख 42 हजार 138 तर वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांना 1 लाख 66 हजार 196 अशी निर्णायक मते मिळाली. काँगे्रसचा हा गड खेचून आणण्यासाठी भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर रणनीती आखण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडकडे विशेष लक्ष होते. काँगे्रसमधील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या माध्यमातून मागील दोन ते तीन वर्षांत पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख या माध्यमातून गावपातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी करण्यात आली होती. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात होते. यामुळे नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड येथे झालेल्या जाहीर सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेनंतर भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. हे वातावरण मतदानापर्यंत टिकवून ठेवण्यात पक्ष यशस्वी ठरला. पंतप्रधान सौभाग्य योजना व पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरात वीज व गॅस जोडणी मोफत देण्यात आली. तसेच प्रत्येक घरी शौचालयाचे बांधकाम करून जिल्हा हागणदारीमुक्‍त करण्यात आला होता. यासह केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्यामुळे पक्षाला याचा चांगला फायदा झाला. अशोक चव्हाण यांना निवडणुकीत टक्‍कर देणारा चेहरा भाजपमध्ये नसल्याने शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपमध्ये आणून चव्हाण यांच्याविरुद्ध मैदानात उतरविण्यात आले. त्याच वेळी नांदेडची लढत चुरशीची होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ बांधत होते. थोड्याफार फरकाने जय-पराजय होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना मोठ्या फरकाने चिखलीकरांनी बाजी मारली. नायगाव, देगलूर व मुखेड या तीन विधानभा मतदारसंघांत भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले; तर भोकर व नांदेड दक्षिणमध्ये काँगे्रसचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले. केवळ नांदेड उत्तर या विधानसभा मतदारसंघातून काँगे्रसला अपेक्षित मताधिक्य मिळाले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उच्चविद्याविभूषित प्रा. यशपाल भिंगे यांना मैदानात उतरविले होते. प्रा. भिंगे यांनी सहाही विधानसभा मतदारसंघांत निर्णायक मते घेतली. तब्बल 1 लाख 66 हजार 196 मते त्यांनी मिळविल्यामुळे काँगे्रसचा पराभव तर भाजपचा विजय सुकर झाला. 

शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा

प्रचारादरम्यान प्रताप पाटील चिखलीकर यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढविला. केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक योजनांचे चांगले मार्केटिंग केले, बूथनिहाय कार्यकर्त्यांना कामाला लावले, अधिकाधिक मतदान कसे करता येईल याकडे लक्ष दिले. यामुळे चिखलीकर यांचा विजय सोपा झाला. भाजपला मिळालेल्या या यशात शिस्तबद्ध प्रचार हे महत्त्वाचे कारण होय. सोबतच चव्हाण यांना विकासकामे करण्यात आलेले अपयश, शहराच्या झालेल्या दुर्दशेचे मार्केटिंग करून काँगे्रसविरुद्ध मतदारांत रोष निर्माण केला. 

राज फॅक्टर फेल

‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत भाजपवर चौफेर हल्‍ला चढवणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या दौर्‍याची सुरुवात नांदेड येथून केली होती. या सभेचा काँगे्रसला काहीच फायदा झाला नाही. नेहमीप्रमाणे त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्यांच्या या सभेमुळे काँगे्रसला फायदा होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात चित्र नेमके उलटे राहिले.