Thu, Jun 04, 2020 23:15होमपेज › Marathwada › ढासळलेला बुरूज उभारण्याचे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान

ढासळलेला बुरूज उभारण्याचे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान

Published On: Nov 16 2018 1:28AM | Last Updated: Nov 15 2018 10:06PMशिरुरः जालिंदर नन्नवरे 

मागच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांना आमदार भीमराव धोंडेच्याकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे सुरेश धस यांनी  राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी  पुढील राजकीय व्यूहरचना आखत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीला रामराम करत राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणारी जिल्हा परिषदेची सत्ता हिरावून भाजपाच्या पथ्थ्यावर पाडली.

भाजपात पुन्हा घरवापसी केल्यामुळे आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या बुरजाला सुरंग लावून मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते धस सोबत भाजपात दाखल झाले. यामुळे मतदार संघात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला गेला आहे. आ.सुरेश धस यांच्या भाजपात जाण्याने मतदार संघातील पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला सावरण्यासाठी सर्व प्रथम भाजप कडून धस यांच्या विरोधात निवडणूक लढलेले बाळासाहेब आजबे यांच्या कडून साथ देण्यात आली. यामुळे विखुरलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा चांगले दिवस येतील अशी आशा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत होती. परंतु त्यांचा जनसंपर्क अपुरा पडत असल्याने   ही आशा देखील फोल ठरली. जिल्हा परिषदेच्या राजकारणानंतर  धनंजय मुंडे व  सुरेश धस यांच्यात रंगलेला वाद अद्यापही कायम आहे.  धस विरोधकावर धनंजय मुंडेचा वाढता प्रभाव राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या नेतृत्वावर अधिक विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकात राष्ट्रवादीचा दबदबा कायम राखायचा असेल  तर सक्षम नेता आवश्यक आहे. मतदार संघाची धुरा बाळासाहेब आजबे, चंपावती पानसंबळ, सतीश  शिंदेच्या खांद्यावर आहे. 

उमेदवारीवरून राष्ट्रवादीत गटबाजी

आगामी निवडणुकात भाजपाच्या उमेदवाराला तगडी फाईट देण्यासाठी राष्ट्रवादी कडून जोरदार प्रयत्न होणार आहेत. परंतु सुरेश धस यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर अनेकांना उमेदवार मिळण्याची आशा लागली आहे. त्यामुळे आपल्या पक्षाला व पक्षश्रेष्ठींना राजकीय वजन दाखवण्यासाठी एकला चलो रे च्या भूमिकेत राष्ट्रवादीत सध्या मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली. ही गटबाजी राजकीय नेत्यांची डोकेदुखी ठरू शकते.

सक्षम नेतृत्वाची मतदार संघाला प्रतिक्षा

आमदार सुरेश धस यांच्या नंतर आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी कडून अद्याप सक्षम नेतृत्वाचा आभाव पाहण्यासाठी मिळत आहे.यामुळे आष्टी-पाटोदा-शिरूर या तिनही तालुक्यात सक्षम नेतृत्व केव्हा तयार होईल याची कार्यकर्ते वाट पाहत आहेत.