Sun, Jun 07, 2020 16:08होमपेज › Marathwada › अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे धरणे

अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे धरणे

Published On: Dec 21 2018 1:25AM | Last Updated: Dec 20 2018 10:46PM
हिंगोली : प्रतिनिधी

गत अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन वाढ, शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन व भत्‍ते लागू करावे यासह विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि.20) सकाळी साडेअकरा वा.अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघातर्फे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जि.प.प्रशासनाला देण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांकडे शासन स्तरावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविक व मदतनिस या संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. तरी सुध्दा शासनाचे या प्रलंबित मागण्याकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष झाले. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी सकाळपासूनच जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जि.प.कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास धरणे आंदोलनास सुरूवात झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. 

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मानधन वाढीचा जीआर तत्काळ काढून त्वरित द्यावी यासाठी राज्य शासनास शिफारस करावे. दर महिन्याचे मानधन इतर कर्मचार्‍याप्रमाणे महिन्याच्या एक तारखेला द्यावे. योजनेच्या कामासाठी लागणारे रजिस्टर्स व एमपीआर द्यावे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना कायम कर्मचार्‍यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन व भत्‍ते लागु करावे. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे गत तीन वर्षापासुनचे थकलेले टीएडीए द्यावे. थकीत इंधन बील त्वरित द्यावे. सर्व अंगणवाडी केंद्रांना चांगल्या प्रतिचे बजनकाटे द्यावे यासह आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने जि.प.प्रशासनाला देण्यात आले.