Fri, May 29, 2020 01:58होमपेज › Marathwada › अंबाजोगाई : स्वरातीमध्ये ३५ वर्षांनंतर ओपन हार्ट सर्जरी !

अंबाजोगाई : स्वरातीमध्ये ३५ वर्षांनंतर ओपन हार्ट सर्जरी !

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 5:42PMअंबाजोगाई : प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्णालयाने ईतिहास रचला असून,तब्बल 35 वर्षानंतर डॉक्टरांनी र्‍हदयाशी सबंधीत दुर्मिळ आजारावर ओपन हार्ट सर्जरी केली आहे. मराठवाड्यात सध्या एकाही शासकीय रूग्णालयात र्‍हदयाशी सबंधीत शस्त्रक्रीया केली जात नाही. स्वरातीमधील डॉक्टरांनी पुढाकार घेतल्यामुळे तीन तपानंतर पहिली र्‍हदय शस्त्रक्रीया शुक्रवारी यशस्वी झाली. डॉक्टरांनी केलेल्या धाडसामुळे एका गरीब रूग्णाला नवे आयुष्य मिळाले आहे.

लातूर येथील प्रसिद्ध हृदय शल्यचिकीत्सक डॉ. सयाजी सरगर यांच्यासह स्वरातीमधील विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे, डॉ.सतिश गिरेबोईनवाड यांच्या सर्जन चमुने ही अवघड शस्त्रक्रीया पार पाडली. या शस्त्रक्रियेसाठी भुलरोग तज्ञ म्हणुन डॉ.गणेश निकम, डॉ.अपर्णा कुलकर्णी, डॉ.देवानंद पवार, डॉ.प्रसाद सुळे यांनी योगदान दिले. इफ्तीकार मनियार (वय 22 वर्ष रा.रविवार पेठ,अंबाजोगाई) या युवकाला पेटन्ट डक्टस आर्टीओस नावाचा र्‍हदयाशी सबंधीत दुर्मिळ आजार होता. एवढ्या कमी वयात हा आजार सहसा आढून येत नाही. जन्मता त्याला हा आजार होता. अर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मनियार कुटुंबीय खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रीया करू शकत नव्हते. मराठवाड्यातील कुठल्याही शासकीय रूग्णालयात र्‍हदयाशी सबंधीत शस्त्रक्रीया सध्या होत नाहीत. या सार्‍या परिस्थितीत मन्यार कुटुंबीयांपुढे मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान स्वराती ग्रामीण शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांनी धाडस केल्यामुळे तब्बल 35 वर्षानंतर ओपन हार्ट सर्जरी स्वरातीमध्ये सुरू करण्यात आली. पहिलीच शस्त्रक्रीया यशस्वी झाली असून, स्वरातीमधील डॉक्टरांनी इतिहास रचला आहे. पस्तीस वर्षांमध्ये प्रथमच झालेली सदरील शस्त्रक्रीया  यशस्वी होणे ही मोठी आनंददायक घटना असून, हृदयावरील याहुन मोठ्या बायपास सारख्या शस्त्रक्रीयांसाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वास अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख यांनी व्यक्त केला.  

खा. प्रीतम मुंडे यांनी केले डॉक्टरांचे अभीनंदन

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही ओपन हार्ट सर्जरी ऐतिहासीक आहे, या शब्दांत रुग्णालयाच्या अभ्यागत समितीच्या अध्यक्ष खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे तसेच हृदयरोग शल्यचिकीत्सक डॉ.सयाजी सरगर यांचे अभिनंदन केले.