Sat, Jul 11, 2020 13:10होमपेज › Marathwada › आजेगाव पुजारी खून प्रकरणाचे धागेदोरे मिळेनात

आजेगाव पुजारी खून प्रकरणाचे धागेदोरे मिळेनात

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:28PMसेनगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिरात 40 वर्षीय पुजार्‍याचा अज्ञात व्यक्‍तीने 3 जुलै रोजी धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. गोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. ठिकठिकाणी पोलिसांचे पथक तपासासाठी गेल्यावर अपेक्षित शोध लागला नाही. त्वरित या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तालुक्यातील आजेगाव येथे नागझरी महादेव देवस्थान आहे. मागील आठ वर्षांपासून शिवदास श्रीराम सौदागर (वय 40) हे मंदिरात पुजारी म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहत होते. 3 जुलै रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी मंदिरात आरती घेण्यासाठी गेले असता, अचानक एका व्यक्‍तीने धारदार शस्त्राने पुजारी सौदागर यांच्यावर वार केले. या घटनेत पुजारी सौदागर यांचा मृत्यू झाला. बाजूच्या मंदिरात दोन व्यक्‍तींना पुजारी यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येताच ते व्यक्‍ती घटनास्थळी मदतीसाठी धावले. मात्र यावेळी 30 ते 35 वर्षे वयोगटातील अंगावर रेनकोट घातलेला अज्ञात आरोपी मोटारसायकलवरून पसार झाला.

सायंकाळच्या सुमारास पुजार्‍यावर धारदार शस्त्राने हल्‍ला करून अज्ञात आरोपी फरार झाला. दरम्यान गंभीर जखमी अवस्थेतील पुजारी सौदागर यांचा औषधोपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. गोरेगाव पोलिसात गजानन काशिनाथ भालेराव यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्‍वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, सहायक पोलिस निरीक्षक एम.एम.कोरंटलू, पोलिस उपनिरीक्षक बी.आर.तिप्पलवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर पोलिसांची तपासासाठी पथक ठिकठिकाणी पाठविण्यात आले. मात्र पुजारी खुनासंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले नाहीत. गुरुवारी (दि.12) उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.भोरे यांच्या कार्यालयात खुनाच्या तपासाबाबत बैठक बोलावण्यात आली होती. सदरील घटना घडून जवळपास दहा दिवस लोटत आहेत. त्या अज्ञात आरोपीचा तपास लावण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले आहे. तत्काळ या प्रकरणाचा तपास लावून आरोपीला जेरबंद करण्याची मागणी तालुकावासीयांतून होत आहे. तसेच सेनगाव शहरातील इंदिरानगर भागातील आठ वर्षीय चिमुरडीवर 5 मे 2017 रोजी अज्ञात इसमाकडून अत्याचार केल्याची घटना घडली होती. 

या घटनेला जवळपास चौदा महिने लोटले आहेत. मात्र अद्याप चिमुरडी अत्याचार प्रकरणाचा तपास लागला नाही. अज्ञात आरोपी अत्याचार करून फरार झाला होता.  सध्या या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी गृह यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदरील प्रकरणातील तत्काळ आरोपीला पकडण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.