Sat, Jun 06, 2020 16:00होमपेज › Marathwada › लातूर : मराठा क्रांतीचे ९ ऑगस्टचे जनआंदोलन होणार

लातूर : मराठा क्रांतीचे ९ ऑगस्टचे जनआंदोलन होणार

Published On: Aug 08 2018 6:11PM | Last Updated: Aug 08 2018 6:11PMलातूर  : प्रतिनिधी

मराठा क्रांतीच्या वतीने पुकारण्यात आलेले ९ ऑगस्टचे राज्यव्यापी जनआंदोलन होणार असल्याची माहिती लातूर जिल्हा मराठा क्रांतीच्या वतीने येथील मराठा क्रांती भवनात बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

लातूर येथे २९ जुलै रोजी राज्यभरातील बावीस जिल्ह्यांच्या मराठा क्रांतीच्या समन्वयकांची राजव्यापी बैठक झाली होती. त्यात सर्वानुमते ९ ऑगस्टच्या राज्यव्यापी जनआंदोलनावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे हे आंदोलन होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होईल. न्यायालयाच्या सुचनेचा आपण आदर करतो तथापी हे आंदोलन केवळ आरक्षणापुरतेच नसून अन्य १९ मागण्यांसाठी ते होत आहे. त्या मागण्या शासनाने मार्गी न लावल्याने समाजाला रसत्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत समाजबांधव रस्त्यावर त्यांचे कुटूंब,वहाने व गुराढोरांसह बैठक देतील. या कालावधीत एकही वाहन रसत्यावरुन जाणार नाही. तथापी रुग्णवाहिकांना मात्र रस्ता करुन दिला जाणार आहे. औषधाची दुकाने, रक्तपेढ्या , दवाखान्यांना या बंदमधुन वगळण्यात आले असून, त्यांनी आपापल्या सेवा सुरू ठेवाव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे. दुकाने, शाळा, महाविद्यालये, बसेस बंद ठेवण्यासाठी संबधीतांना विनंती करण्यात आली आहे. अनेक संघटनांनी या जनआंदोलनास पाठींबा दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

परळी येथील आंदोलनाबाबत काही जणांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तीक स्वरुपाचा असून त्याच्याशी मराठा क्रांतीचा काहीएक संबध नाही. जनआंदोलन होणार असून  आंदोलनानंतरची  पुढील दिशा लवकरच परभणी येथे होणाऱ्या मराठा क्रांतीच्या राज्यव्यापी बैठकीतून जाहीर केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रेल्वे भरती उमेदवारांना सहकार्य

आज होत असलेल्या रेल्वेभरती परीक्षेच्या उमेदवारास या आंदोलनाचा कसलाही त्रास होणार नाही याची याची काळजी घेण्यात आली आहे.  परीक्षार्थीला त्याच्या परीक्षाकेंद्रावर जाण्यास उशीर होत असेल तर  क्रांती मोर्चाचे
स्वंयसेवक  त्याला स्वताच्या वाहनाने परीक्षा केंद्रावर सोडणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.