Sun, Jun 07, 2020 16:03होमपेज › Marathwada › बीड : चार गावातील ८० लोकांना विषबाधा

बीड : चार गावातील ८० लोकांना विषबाधा

Published On: Jan 17 2019 9:54PM | Last Updated: Jan 17 2019 9:55PM
माजलगाव (बीड) : प्रतिनिधी 

एकादशीच्या उपवासाला खाल्लेल्या भगरीच्या पिठामुळे माजलगाव तालुक्यातील उमरी, रोषणपुरी, कोथरूळ येथील 80 हुन अधिक लोकांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या लोकांना मजलगाव ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या लोकांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काही अत्यवस्थ रुग्णांना बीडच्या रुग्णालयात पाठविण्यात आले.

गुरुवारी पौष महिन्यातील एकादशी (दि. १७) होती. त्यानिमित्ताने ग्रामीण भागात अनेकजण एकादशीला उपवास करतात. उपवासाच्या फराळासाठी उमरी, रोषणपुरी, कोथरूळ या गावातील लोकांनी स्थानिक किराणा दुकानदारांकडून भगरीचे पीठ विकत घेतले होते. हे पिठ दोन दिवसापूर्वीच स्थानिक किराणा दुकानदारांनी एका खासगी व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले. हेच पीठ गुरुवारी गावातील नागरिकांना विकल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

त्यानंतर गावातील लोकांनी फराळासाठी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्या. दुपारनंतर उमरी गावातील चार, पाच जणांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरु झाला. काहीजण शहरातील खासगी रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर असा त्रास होणाऱ्यांची संख्या इतर गावातूनही वाढत गेली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उमरी, रोषणपुरी, कोथरुळ येथील जवळपास ८० रुग्ण दाखल झाले. यात ६० ते ६५ महिला रुग्णांचा समावेश आहे. 

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णावर उपचार करण्यात येत असून अत्यवस्थ रुग्णांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जागा अपुरी पडत असल्याने रुग्णालयातील एका खाटावर दोन रुग्णांना झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णांची संख्या वाढत गेल्याने तालुक्यातील प्राथमिक रुग्णालयातील डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन रुग्णावर उपचार केले. यात डॉ. गजानन रुद्रवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, डॉ. दत्तात्रय पारगावकर, डॉ. आनंद उघडे, डॉ. नागरगोजे, डॉ. प्रसाद कुलकर्णी सहभाग होता.