Sat, Jun 06, 2020 00:54होमपेज › Marathwada › इसापूर धरणात 60 टक्के पाणीसाठा

इसापूर धरणात 60 टक्के पाणीसाठा

Published On: Aug 24 2018 12:45AM | Last Updated: Aug 23 2018 8:58PMहिंगोली : प्रतिनिधी

इसापूर धरणाच्या वरच्या बाजूला होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यात वाढ होत आहे. मागील 24 तासांत धरणामधील पाण्याच्या टक्केवारीत 12 टक्क्यांनी वाढ झाली असून, धरणाचा पाणीसाठा 62 टक्क्यावर येऊन पोहचल्याने या पाण्याचा रब्बी हंगामासाठी लाभ होणार आहे. तसेच धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणीटंचाईही दूर होणार आहे.

गतवर्षी इसापूर धरण 14.17 टक्के भरले होते. त्यामुळे रब्बी हंगामासाठी केवळ दोन पाणी पाळ्या सोडण्यात आल्या होत्या. उन्हाळी हंगाम धोक्यात आला होता. यावर्षी मात्र धरणाच्या लाभ क्षेत्रातील बुलडाणा, वाशिम, हिंगोली तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. या धरणावर अनेक पाणीपुरवठा अवंबलून आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे. सध्या धरणात 62.03 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणीपातळी 437.06 मीटरवर येऊन पोहचली असून एकूण पाणीसाठा 913.0135 दलघमी झाला आहे. यामध्ये उपयुुक्‍त पाणी साठा 598.0498 दलघमी पर्यंत येऊन पोहचला आहे. धरणात येणार्‍या पाण्याची आवक 24.6486 दलघमी एवढी आहे. सध्या पाण्याची आवक सुरूच असल्याने येत्या पंधरा दिवसांत धरण 75 टक्के पेक्षा जास्त भरणार असल्यामुळे या धरणावर अवंलबून असलेल्या शेतकर्‍यांच्या आशा पल्‍लवीत झाल्या आहेत. रब्बी हंगामाबरोबरच उन्हाळी हंगामातही पाणी पाळ्या सोडणे शक्य होणार असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 15 हजार हेक्टरवरील पिकांना या धरणाच्या पाण्याचा थेट लाभ होणार आहे.