Sun, May 31, 2020 01:37होमपेज › Marathwada › ५ हजार क्विंटल तूर वाहनांतच पडून

५ हजार क्विंटल तूर वाहनांतच पडून

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 06 2018 12:03AMगेवराई : विनोद नरसाळे

हमी भाव केंद्रात तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात धावपळ करत आहे, मात्र खरेदीसाठी आवश्यक बारदाना नसल्याचे कारण पुढे करत, येथील केंद्रात दोन दिवसांपासून तुरीची खरेदी बंद करण्यात आलेली आहे. याठिकाणी तूर घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या असून, तब्बल 20 ते 25 हजार क्विंटल तूर याठिकाणी वाहनामध्येच पडून आहे. यामुळे शेतकर्‍यांसह वाहनधारकांना देखील ताटकळत बसलेले दिसून आले, तसेच तूर घेऊन वाहने उभी राहत असल्याने वाहनधारक अधिक भाडे अकारत आहेत. परिणामी शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील तुरीचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात निघाले आहे. दरम्यान आडत बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या आडत बाजारात तुरीला 3 हजार 800 रुपये आसपास भाव दिला जात आहे. त्यामुळे याठिकाणी शेतकर्‍यांची मोठी लूट होते. त्यामुळे शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर हमीभाव केंद्रावर 5 हजार 400 रु. भाव मिळत असल्याने, या ठिकाणी तूर घेऊन येत असल्याचे येथील उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितले, मात्र खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागा नाही, तसेच आवश्यक बारदाना नसल्याचे कारण सध्या पुढे करून खरेदी बंद केली जात आहे. 

सध्या या आवारात शेतकरी वाहनामध्ये घेऊन आलेले तूर 20 ते 25 हजारांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. शेतकर्‍यांना ताटकळत बसावे लागत असून, मुक्काम देखील याच ठिकाणी करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मार्चमध्ये तूर खरेदी होती बंद

2 फेब्रुवारी रोजी येथील खरेदी केंद्रात तुरीची खरेदी करण्यास सुरुवात झाली. दरम्यान खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करत 8 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत येथे तूर खरेदी बंद होती. त्यामुळे नाविलाजास्तव पैशाची गरज असलेल्या शेतकर्‍यांनी खाजगी व्यापार्‍यांना कमी भावात तूर विकली. आत्तापर्यंत या तूर खरेदी केंद्रात केवळ 15 हजार क्विंटल तुर खरेदी झालेली आहे.

 

Tags ; Gevrai, Gevrai news, Pigeon pea, 5 thousand quintals,