Thu, May 23, 2019 23:20होमपेज › Marathwada › क्षयरूग्णांना औषधोपचारासाठी 3 हजार रूपये

क्षयरूग्णांना औषधोपचारासाठी 3 हजार रूपये

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:49PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात क्षयरुग्णांना आता उपचार करण्याबरोबरच शासकीय मदतीचा लाभ मिळणार आहे. यात सहा महिन्यांच्या उपचारात तीन टप्पे केले आहेत. यात पहिल्या टप्प्यात नवीन क्षयरुग्णास प्रथम औषधोपचाराकरिता 1, दुसर्‍यांदा पाठपुरावा औषधोपचाराकरिता 1 तर औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर 1 असे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती परभणीचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.पी.एस.वडकुते यांनी दिली आहे.  

क्षयरोग किंवा ट्यूबरक्लोसिस (टीबी) हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणू संक्रमणामुळे होणारा एक रोग आहे. तो फुफ्फुसांना प्रभावित करतो. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्येही तो होतो. 
क्षयरोग (टीबी) हा एक संसर्गजन्य आजार असून तो झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसर्‍याच्या शरीरात पोहचून प्रसार करतात. हा एक गंभीर आजार असला, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आणि नियमित औषधोपचार केल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो. क्षयरोग होण्याचा सर्वाधिक धोका  लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणार्‍या व्यक्ती, गंभीर आजाराने पीडित रुग्ण, अस्वच्छ आणि जास्त गर्दीच्या ठिकाणी राहणारे व्यक्ती यांना जास्त असतो.

परभणी व गंगाखेडात अत्याधुनिक सिबीनेट मशीन कार्यान्वित  

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परभणी येथे जिल्हा क्षयरोग केंद्रात तसेच गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सिबीनेट मशीनची उपलब्धता केली आहे. या मशिनद्वारे एमडीआर क्षयरुग्णांचे निदान दोन तासांतच उपलब्ध होत असून त्यांना लवकर औषधोपचार सुरू होतो. 

अशी आहेत क्षयरोगाची लक्षणे :   तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, बेडकायुक्त खोकला येणे, थुंकीतून व खोकल्यातून रक्त येणे, छाती दुखणे, दम लागणे,  अशक्तपणा, भूक न लागणे, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

पोषण आहारासाठीही 500 रुपये प्रतिमहिना  

जिल्ह्यात आता क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण आहार योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रुग्णांच्या पोषण आहारासाठी आधारकार्ड नंबर व बँक खात्याचा तपशील जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास दिल्यानंतर बँक खात्यावर दरमहा 500 रुपये, जमा केले जाणार आहेत. याकरिता सदरील रुग्णांची माहिती घेण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.