Sat, Jun 06, 2020 16:26होमपेज › Marathwada › 25 गाव पाणीपुरवठा योजनेला गळती

25 गाव पाणीपुरवठा योजनेला गळती

Published On: Dec 29 2018 1:37AM | Last Updated: Dec 28 2018 10:07PM
आखाडा बाळापूर : प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थिती असल्याने कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईचा काळात पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचा आहे, परंतु 25 गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामठा फाटा येथील टाकीजवळ गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या नासाडीकडे दुर्लक्ष होत आहे.

इसापूर धरणातून 25 गाव पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेतून जवळपास 25 गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु अनेक गावांमध्ये पाईपलाईन दुरूस्ती व इतर कारणामुळे पाणी पुरवठा होत नाही. सध्या केवळ 7 गावांनाच या पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या आखाडा बाळापूरला पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी कामठा फाटा येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. परंतु या टाकीवर पाणी पुरवठा होणार्‍या मुख्य पाईपलाईनला ठिकठिकाणी छिद्र पडून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दुष्काळी परिस्थित असतांनाही या संपूर्ण प्रकाराकडे शिखर समितीबरोबरच जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्‍त होऊ लागली आहे. या पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी किमान 50 हजाराचा खर्च आवश्यक आहे. परंतु तो खर्च नेमका कुठून करायचा असा प्रश्‍न शिखर समितीसमोर पडल्याने सध्या या किरकोळ दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

25 गाव पाणी पुरवठा योजना अनेकदा थकीत वीज बिलापोटी बंद राहिल्याच्या घटना घडल्या होत्या. शिखर समितीच्या माध्यमातून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परंतु आता कामठा फाटा येथील असलेल्या जलकुंभाच्या पाईपांना छिद्र पडून पाणी वाया जात आहे. शिखर समितीसमोर दुरूस्तीसाठी लागणारा निधी कसा उभारावा असा प्रश्‍न उपस्थित राहिला आहे. यावर लवकरच तोडगा काढण्याची गरज आहे.

इसापूर धरणात सध्या 48 टक्के पाणीसाठा आहे. या धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिलनंतर धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करून पाण्याची नासाडी होणार नाही, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.