Fri, Jun 05, 2020 21:26होमपेज › Marathwada › शाळा दुरुस्तीसाठी 25 कोटींचा निधी

शाळा दुरुस्तीसाठी 25 कोटींचा निधी

Published On: Dec 06 2018 1:36AM | Last Updated: Dec 06 2018 1:36AM
बीड : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारी शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजनेतून  जिल्ह्यातील एक हजार 927 शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी 20 लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या निधीतून अकराही तालुक्यांतील शाळांची दुरुस्ती होणार असून त्यांना नवं रूप मिळणार आहे.  

जिल्हयातील अकरा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे 2 हजार 537 शाळा असून बहुतांश ठिकाणी शाळा खोल्यांची दुरावस्था झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळा खोल्यांची  दुरूस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडे पाठवला होता. या विभागाच्या तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी लगेचच हा प्रस्ताव मंजूर करून  25 कोटी 20 लाख 40 हजार रूपये इतका निधी उपलब्ध करून दिला. तसे आदेशही जिल्हा परिषदेला निर्गमित केले आहेत. दुरूस्तीनंतर सर्व शाळांची रंगरंगोटी  एक सारखी असावी आणि 26 जानेवारी पर्यंत त्याचे काम पूर्ण करावे अशा सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या अकराही तालुक्यांत असणार्‍या  एक हजार 927 शाळा खोल्यांना दुरूस्तीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संबंधित शाळांच्या गरजेनुसार खोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.  दरम्यान जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. ग्रामीण भागात अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत. दुसरीकडे पावसाळ्यात शाळेला जाण्यास रस्ताही नसतो तर काही शाळांना बाराही महिने रस्ताच नाही. अशावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता शाळा इमारतीबरोबर रस्त्यासाठी निधी  देण्याची गरज आहे.