Mon, Jun 01, 2020 18:14
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › २० हजार हेक्टरवरील मोसंबी बागा धोक्यात 

२० हजार हेक्टरवरील मोसंबी बागा धोक्यात 

Published On: Nov 19 2018 1:02AM | Last Updated: Nov 19 2018 12:01AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात 2012 नंतर मोसंबी बागायतदार शेतकर्‍यांवर यावर्षी पुन्हा एकदा पडलेल्या दुष्काळामुळे पाणी संकट ओढवले आहे. या पार्श्‍वभूमीवर 20 हजार हेक्टरवरील मोसंबी बागा पाण्याअभावी जगवायच्या कशा, हा प्रश्‍न मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढविताना दिसत आहे.

जालना जिल्हा मोसंबी हब म्हणून ओळखला जातो. 2012 पूर्वी या जिल्ह्यात तब्बल 36 हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड करण्यात आलेली होती. मात्र 2012 च्या दुष्काळात जवळपास 16 हजार हेक्टरवरील मोसंबीच्या बागा जळाल्या. मोसंबी पिकास पाच वर्षानंतर फळ येते. मोठ्या बागांना तुलनेने जादा पाणी लागत असल्याने त्या जगवीणे अवघड जाते.सध्याच बहुसंख्य विहीरींनी तळ गाठल्याने पाणी प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे आगामी चार महिन्यात पाणी प्रश्‍न अजुनही गंभीर होणार आहे. मार्चपर्यंत बागा जगवीण्यात शेतकर्‍यांना यश आले तरी एप्रिल, मे व जुन हे तीन महिने मोसंबी बागांसाठी कसोटीचे ठरणार आहे.2012 मध्ये शेतकर्‍यांसमोर पाण्याअभावी बागा जळत असताना शेतकर्‍यांना काहीच करता आले नव्हते.यावेळीही पुन्हा तीच परिस्थिती उदभवणार असल्याने शेतकरी भयभित आहेत. शासनाने ठिबक सिंचनची सबसिडी 80 टक्के केली असली तरी आडातच नसल्यावर पोहर्‍यातुन कोठुन येणार हा प्रश्‍न आहे. 

मुळात विहीरीतच पाणी नसले तर बागांना ठिबक केल्यानंतर पाणी आणायचे कोठून हा गंभीर प्रश्‍न आहे. मोसंबी हब म्हणुन ओळखल्या जाणार्‍या जालना जिल्ह्याची ओळख या दुष्काळात पुसल्या तर जाणार नाही ना असा प्रश्‍न आहे. जिल्ह्यासारखी परिस्थिती औरंगाबाद व मराठावाड्यातील इतर गावांची असल्याने भविष्यात मोसंबी बागांचे न भरुन येणारे नुकसान होणार आहे. जालना मोंढयात मोसंबीची मोठी उलाढाल होते. येथुन दररोज कलकत्ता, दिल्ली, नागपुर, हैदराबाद व इतर ठिकाणी मोसंबी पाठवली जाते. मोसंबी बागा जळाल्यास पुढील वर्षी मोंढ्यातील उलाढाल थंडावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.