Thu, Oct 17, 2019 13:05होमपेज › Marathwada › उक्‍कलगावला कच्च्या दुधातून 13 जणांना झाली विषबाधा

उक्‍कलगावला कच्च्या दुधातून 13 जणांना झाली विषबाधा

Published On: Aug 24 2018 12:45AM | Last Updated: Aug 23 2018 10:33PMमानवत : प्रतिनिधी   

तालुक्यातील उक्कलगाव येथे  कच्च्या दुधाचा खरस खाल्ल्याने 11 मुलांसह दोन महिलांना  विषबाधा झाल्याची घटना दि.23 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली . ही सर्व मुले  12 वर्षाच्या आतील असून शहरातील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील नारायण उक्कलकर यांच्या गाईने गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वासराला जन्म दिला होता. सकाळी दहाच्या सुमारास कच्च्या दुधाचा खरस  करुन घरातील व आजूबाजूला राहणार्‍या शेजारच्या मुलांनाही खायला दिला होता.  खरस खाल्यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, चकरा येत असल्यामुळे घरच्यांनी या मुलांना मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

या मुलांमध्ये स्नेहा संपत उक्कलकर, कांचना नारायण उक्कलकर, आरती उत्तम उक्कलकर, प्रीती उत्तम उक्कलकर, गायत्री उत्तम उक्कलकर, सरस्वती उत्तम उक्कलकर, शिवकन्या रंगनाथ गोंगे, अंजली रंगनाथ गोंगे, श्रुती रंगनाथ गोंगे, संस्कृती हरिभाऊ पांचाळ, समर्थ हरिभाऊ पांचाळ या मुलांसह  गीता उक्कलकर, सुभाबाई मुंगे  या महिलांचा देखील समावेश आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या मुलांसह महिलांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.