Wed, Jun 19, 2019 08:20होमपेज › Marathwada › सव्वा लाखाच्या खंडणीसाठी ११ वर्षीय मुलाचे अपहरण; एकास अटक

सव्वा लाखाच्या खंडणीसाठी ११ वर्षीय मुलाचे अपहरण; एकास अटक

Published On: Oct 10 2018 5:15PM | Last Updated: Oct 10 2018 5:15PMहिंगोली/कुरूंदा : प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील परजना येथील ११ वर्षीय मुलाचे १ लाख २० हजाराच्या खंडणीसाठी गावातील एका तरूणाने काल, मंगळवार (दि.९) सायंकाळच्या सुमारास गावातून अपहरण केले होते. याप्रकरणी मुलाच्या वडीलानी कुरूंदा पोलिस ठाण्यात गावातीलच ज्ञानेश्‍वर सूर्यभान कर्‍हाळे याने मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्‍त करत फिर्याद दिली होती. कुरूंदा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासा दरम्यात हिंगोली येथील अकोला बायपास परिसरात असलेल्या साई रिसॉर्टजवळ अपहरणकर्ता ज्ञानेश्‍वर कर्‍हाळे यास वैभवसह ताब्यात घेतले. आणि त्या मुलाची सुखरूप सुटका करून त्याला वडीलांच्या ताब्यात दिले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत तालुक्यातील परजना येथील अकरा वर्षीय वैभव विष्णू गायकवाड हा गावातील मारोती मंदिराजवळ काल, मंगळवार सायंकाळच्या सुमारास खेळत होता. यावेळी गावातील ज्ञानेश्‍वर सुर्यभान कर्‍हाळे याने त्यास आपल्या मोटारसायकलवर बसवून अपरण केले. आणि हिंगोली येथे नेवून त्याचे वडील विष्णू गायकवाड यांना दुरध्वनीवरून संपर्क करत आपला मुलगा सुखरूप हवा असल्यास आपल्या बँक खात्यावर १ लाख २० हजाराची रक्‍कम टाका असे सांगून धमकावले. 

त्यामुळे भयभीत झालेल्या विष्णू गायकवाड यांनी थेट कुरूंदा पोलिसात जात हा प्रकार सांगितला. यावेळी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे गतीमान करीत सायबर सेलच्या मदतीने मोबाईल लोकेशन काढून आरोपीला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला. कर्‍हाळे हा अकोलाबायपास परिसरातील साई रिसॉर्टजवळ असल्याचे मोबाईल लोकेशनवरून लक्षात येताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी व कुरूंदा पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करीत अपहरणकर्ता ज्ञानेश्‍वर कर्‍हाळे यास वैभवसह ताब्यात घेतले. त्यानंतर वैभव यास त्याच्या वडीलाच्या स्वाधीन केले.