Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Konkan › पोलिस संरक्षणात होणार मुंबई-गोवा महामार्गाचे काम

पोलिस संरक्षणात होणार मुंबई-गोवा महामार्गाचे काम

Published On: Mar 12 2019 1:49AM | Last Updated: Mar 12 2019 1:49AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. परशुराम ते खेरशेत या दरम्यान सुरू असलेल्या कामाला देखील गती मिळत नसल्याने अखेर या मार्गावरील काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यासाठी शक्य त्या ठिकाणी पोलिस संरक्षणात काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच पेढे, परशुराम तसेच शहरातील कामाला प्रारंभ होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करणार, असे अनेकदा जाहीर करण्यात आले. मात्र, या कामाला गती मिळालेली नाही. दहा टप्प्यांमध्ये काम सुरू झाले असले तरी शासनाला अपेक्षित असलेले काम संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता केंद्र शासनाने या कामाला गती देण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी विरोध आहे, अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावून काम सुरू करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. हे काम पूर्वीच मंजूर असल्याने प्रशासनाला या कामासाठी आचारसंहितेची बाधा नाही. त्यामुळे निवडणूक काळात देखील पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. 

आठ दिवसांपूर्वी सावर्डे येथील बाजारपेठेत महामार्गालगतची दुकाने, गाळे, टपर्‍या हटविण्यात आल्या. यानंतर आता चिपळूण व परशुराममध्ये ही कारवाई होणार आहे. येत्या काही दिवसांतच पोलिस फौजफाट्यासह ही कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्थानिक अधिकार्‍यांना सक्त आदेश दिले आहेत. हे आदेश देताना महामार्गाच्या आराखड्यामध्ये कोणताही बदल होणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. महामार्गाच्या आराखड्यानुसारच काम होईल. त्यात बदल सूचविण्याचा स्थानिक अधिकार्‍यांना अधिकारच देण्यात आलेला नाही हे स्पष्ट करण्यात आले असून रखडलेल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावून काम सुरू करा, असे सक्त आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग, महसूल, पोलिस व अन्य खात्यांचे अधिकारी या  कार्यवाहीच्या तयारीला लागले आहेत. येत्या काही दिवसांतच अनेक दिवस रखडलेले पेढे, परशुराममध्ये देखील काम पोलिस बंदोबस्तात सुरू केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

पेढे-परशुराम येथील जमिनीचा मोबदला जिल्हा न्यायालयाकडे वर्ग आहे. हा मोबदला 90:10 प्रमाणे वितरित करावा असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, त्या बाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. मात्र, मोबदला वाटपाआधीच बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे.