होमपेज › Konkan › विजयदुर्ग किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष!

विजयदुर्ग किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष!

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:42PM

बुकमार्क करा
विजयदुर्ग : वार्ताहर
विजयदुर्ग किल्ल्याच्या महाकाय बुरूजासाठी किती निधी मंजूर झाला होता आणि किती खर्च झाला याचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात येणार असून या कामात कुठलाही झालेला भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही.तसेच जर निधी शिल्लक असेल तर राहिलेल्या कामात दिरंगाई का केली जाते? याबाबतची चौकशी व्हावी, अशी मागणी देवगड तालुका युवक स्वाभिमानचे अध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी केली असून किल्ल्यावर वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे किल्ल्याला मोठी हानी पोचत आहे याबद्दलही नाराजी व्यक्‍त केली.

विजयदुर्ग येथील किल्ल्यातील साफसफाईचे काम संथ गतीने सुरू असून किल्ल्यातील तटबंदीवरील झाडझुडपे साफ करण्यास दिरंगाई होत आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे प्रवेशव्दार सध्या दयनीय अवस्थेत असून दोन दरवाजांपैकी एकच दरवाजा शिल्लक राहिला आहे. हा दरवाजा देखील दोरीने बांधून ठेवण्यात आला आहे. या दरवाजावरील असलेली नगारखान्याची स्थिती बिकट असून अनेक फळ्या  तुटून पडत आहेत.किल्ल्यातील दर्याबुरूजाला भेगा गेलेल्या असून या बुरूजाची तटबंदी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बुरूजाचा समुद्राच्या बाजूने मोठे भगदाड पडले असून यामुळे ही तटबंदी देखील कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. किल्ल्यातील असलेल्या खलबतखान्यात सामान ठेवल्यामुळे सध्या पर्यटकांना हा खलबतखाना पाहता येत नाही.विजयदुर्ग किल्ल्यात ज्याठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्वज फडकावला त्या टेकडीवर सर्वत्र झाडी-झुडपे वाढली आहेत. यामुळे याठिकाणी पर्यटकांना जाता येत नाही.ज्या किल्ल्यावरून ‘हेलियम वायू’चा शोध लागला त्याठिकाणी माहिती देणारा कोणताही फलक लावलेला नाही. दर्याबुरुजाचे काम होणार म्हणून सांगण्यात आले होते परंतु दोन वर्ष झाली तरी याचे काम सुरू झालेले नाही. यामुळे विजयदुर्ग किल्ल्यासाठी मोठा निधी मिळत असताना प्रत्यक्षात मात्र, काम होताना दिसत नसल्याने याबाबत चौकशी करणार असल्याचे  युवक स्वाभिमानचे अध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या समेवत रामेश्‍वरचे नवनिर्वाचित सरपंच विनोद सुके, विजयदुर्ग उपसरपंच महेश बिडये, स्वाभिमानचे शाबीन परेरा, यशपाल जैतापकर, विवेक लांजेकर, सागर फणसेकर, संतोष पवार, काजी आदी स्वाभिमानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.