Mon, Sep 16, 2019 12:00होमपेज › Konkan › राणेसाहेब...डीएड्, बीएड्धारकांना न्याय द्या

राणेसाहेब...डीएड्, बीएड्धारकांना न्याय द्या

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 14 2018 11:47PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गेली आठ वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे कोकणातील हजारो डीएड्, बीएड्धारक बेरोजगार झाले आहेत. आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्याने आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री, कोकणचे नेते खा. नारायण राणे यांची भेट घेऊन व्यथा मांडली. साहेब, आमच्या मागण्या मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा, असे साकडे खा. राणे यांना घातले.

कणकवली येथे झालेल्या या भेटीवेळी संघटनेचे अध्यक्ष भीवसेन मसूरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव लखू खरवत, अतुल वाढोकार, भाग्यश्री नर, कृपाली शिंदे, वैभव चव्हाण, प्रणाली रेडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सन 2010 साली राज्यभरात शिक्षक भरती झाली होती. दरवर्षी जिल्हा स्तरावरून होणारी भरती 2010 साली राज्य स्तरावरून करण्यात आल्याने त्या भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलण्यात आले. त्यानंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत स्थानिकांनी आंदोलन करून भरती बंद पाडण्यात आली होती. आता तेच धोरण पुन्हा शासन पुन्हा रेटू पाहत आहे. 2010 सारखी भरती प्रक्रिया राबवल्यास डीएड्, बीएड् धारक देशोधडीला लागणार आहेत, ही वस्तुस्थिती खा. राणे यांच्याकडे मांडण्यात आली.

स्थानिक शिक्षक भरतीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या तीनही जिल्ह्यांत वातावरण तापले आहे. महिनाभरापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार करण्यात आला. याबाबतची माहिती व निवेदन खा. राणे यांना देण्यात आले.

स्थानिकांना भरतीत आरक्षण मिळावे, यासाठी धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे. तसा निर्णय घेऊन कोकणातील बेरोजगारांना न्याय द्यावा,  अशी मागणी खा. राणे यांच्याकडे करण्यात आली. परजिल्ह्यांतील शिक्षकांना कोकणातील बोली भाषेत शिकवता येत नाही. कोकणात नोकरीला लागतात आणि दरवर्षी 500 ते 600 शिक्षक जिल्हाबदली करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. रत्नागिरी, सिंधुुदुर्ग जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात जिल्हा बदली होत असल्याने कोकणातील शाळा ओस पडतात. विद्यार्थ्यांचे नुकसान होते, या समस्यांवरही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. कोकणातील डीएड्, बीएड् धारकांच्या प्रश्‍नाबाबत आपण सकारात्मक असून हा विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन यावेळी खा. नारायण राणे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

कोकणातील डीएड्, बीएड् धारकांच्या प्रश्‍नाबाबत आपण सकारात्मक आहोत. संबंधितांशी बोलून हा विषय मार्गी लावू. कोकणातील तरुणांच्या आम्ही पाठिशी आहोत.
- खा. नारायण राणे