Fri, Jun 05, 2020 03:14होमपेज › Konkan › पनवेलमध्ये टँकरच्या धडकेत झोंबडीतील कारचालक ठार

पनवेलमध्ये टँकरच्या धडकेत झोंबडीतील कारचालक ठार

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:46AM
शृंगारतळी : वार्ताहर

गुहागर तालुक्यातील खोडदे येथील एक खासगी कार विरारहून येत असताना पनवेल जवळच्या कर्नाळा खिंडीत या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये झोंबडी (ता. गुहागर) येथील कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 16) दुपारी घडला.

गुहागर तालुक्यातील खोडदे येथील गोणबरे नामक शिक्षक झोंबडी येथे नोकरीस आहेत. आपल्या परिवाराला मुंबईतील विरार येथे सोडण्यासाठी आपली गाडी अल्टो (एम.43 एफ 2229) ने गेले होते. या गाडीवर रज्जब महम्मद ममतुले (रा.झोंबडी) हा चालक होता. गोणबरे कुटुंबाला विरार येथे सोडल्यानंतर चालक ममतुले एकटाच गाडी घेऊन परत येत होता. यावेळी पेणजवळच्या कर्नाळा खिंडीत या गाडीला मागून एच.पी. गॅस  टँकरने जोरदार धडक  दिली. यामध्ये अल्टो कार पुढील इनोव्हा गाडीवर जाऊन आदळली, तर इनोव्हा गाडी पुढे असणार्‍या बसवर आदळली. धडक एवढी भीषण होती की अल्टो कार चालकास गॅस कटरच्या सहाय्याने पत्रा कापून कारमधून काढण्यात आले. अल्टो कार गॅस टँकर व अन्य वाहनांमध्ये सापडल्याने तिचा चक्काचूर झाला व यामध्ये कार चालक चिरडला गेला. 
या गाडीच्या पुढे असणारी इनोव्हा गाडी मुंबई ते दापोली अशी प्रवास करीत होती. या गाडीतील समिक्षा शेखर भोसले (वय 16) व सोनिका नरेश माने (4) या देखील किरकोळ जखमी झाल्या आहेत. शेखर भोसले हे इनोव्हातून दापोलीकडे चालले होते. 

दरम्यान, या प्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. या अपघाताची नोंद पनवेल पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक  पोलिस निरीक्षक झांझुर्णे करीत आहेत. या अपघाताचे वृत्त गुहागर येथे समजताच शृंगारतळी व झोंबडीतून अनेकांनी कर्नाळा घाटीकडे धाव घेतली.