Mon, Sep 16, 2019 06:04होमपेज › Konkan › राजकीय विशेष : लोकसभा, विधानसभा निवडणूकपूर्व हालचाली!

राजकीय विशेष : लोकसभा, विधानसभा निवडणूकपूर्व हालचाली!

Published On: Feb 08 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 9:04PMसिंधुदुर्ग : गणेश जेठे

2018 हे नवे वर्ष उजाडले तेव्हाच 2019 या सालाचे सिंधुदुर्गच्या राजकारणात चर्चा सुरू झाली. कारण 2019 या एकाच वर्षात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. कदाचित त्या गेल्या वेळीप्रमाणे वेगवेगळ्या महिन्यात होतील किंवा एकत्रही होऊ शकतील. कशाही झाल्या तरी वर्षभरानंतर या निवडणूकांचा महासंग्राम सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.  शिवसेना-भाजप युती होईल 

का ? काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असेल का? माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भूमिका काय असेल? या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी युती आघाडी होवो न होवो आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे अशी स्ट्रेटेजी इच्छुक उमेदवारांनी अवंलबिली आहे. 

गेल्या वेळी 2014 सालातील एप्रिल महिन्यात लोकसभेच्या आणि ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी माजली होती. मोदी लाटेने काँग्रेसची फार वाताहात लावली होती. तळकोकणात मात्र शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी काँग्रेसचे माजी खा. नीलेश राणे यांचा पराभव केला होता. नारायण राणे यांच्यासाठी तो मोठा राजकीय धक्का होता. नंतरच्या चार महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत राणे स्वतः पराभूत झाले. शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांनी त्यांचा कुडाळ मध्ये पराभव केला. त्यामुळे तळकोकणातील राजकारणात मोठे राजकीय परिवर्तन झाले. म्हणूनच ही निवडणूक कोकणातील राजकारणात ऐतिहासिक निवडणूक ठरली. परिणामी नव्या नेतृत्वाकडून लोकांच्या प्रचंड प्रमाणात आशा उंचावल्या. नवे मंत्री, खासदार यांनी तसे प्रयत्न देखील केले. अनेक निर्णय घेतले. परंतू लोकांच्या जितक्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत हे खरे आहे. 

बघता बघता लोकसभा निवडणुकीला चार वर्षे आणि विधानसभा निवडणुकीला साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आता वर्षे-दीड वर्षे शिल्लक आहे. लोकसभा-विधानसभा निवडणूकीची तयारी आतापासूनच करणे क्रमप्राप्त आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे नेते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सावंतवाडीत भाजपचा मेळावा घेतला. कुडाळच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला. युती होईल असे संकेत त्यांनी दिले, इच्छा व्यक्त केली. त्याचवेळी कुडाळ दौर्‍यावर असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना  स्वतंत्रपणे लढणार असे जाहीर करून टाकले. शिवसेना-भाजप युती गेली 30 वर्षे आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत ही युती झाली होती. तशी ती आत्ताही होऊ शकते. परंतुही  लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित राहण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती राहण्याची शक्यता कमीच दिसते. मैदानात एकमेकांविरोधात लढायचे आणि निवडणूक निकालानंतर  सत्ता स्थापणेसाठी एकत्र यायचे असे धोरण अवलंबिले जाऊ शकते. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खा. विनायक राऊत हे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपकडून लोकसभा उमेदवारीसाठी या मतदार संघात अद्यापही कुणी राजकीय नेता पुढे आलेला नाही. मात्र लोकसभा निवडणूकीत युती झाली नाही तर भाजपकडून सध्याचे केंद्रीय मंत्री आणि या मतदार संघातून यापूर्वी चारवेळा निवडून आलेले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हेच उमेदवार असतील. 

विधानसभा निवडणूकीत युती होणार नाही याची जवळपास खात्री स्थानिक नेत्यांना आहे. म्हणूनच विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते प्रयत्न करत आहेत. कणकवली विधानसभा मतदार संघातून गेल्या निवडणूकीत सुभाष मयेकर हे उतरले होते. आता शिवसेनेतील जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांच्या नावाची चर्चा या मतदार संघात सुरू आहे. कुडाळमध्ये भाजपकडून अतुल काळसेकर यांचे नाव चर्चेत असून सावंतवाडीतून भाजपाचे सरचिटणीस माजी आ. राजन तेली पुन्हा चर्चेत आहेत. अर्थात काळसेकर आणि तेली दोघेही विविध कार्यक्रम राबवून निवडणूकपूर्व तयारी करताना दिसत आहेत.  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे  हे तळकोकणातील लोकसभेची आणि विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची शक्यता आहे.

कसभेसाठी स्वतः राणे रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे. किंवा माजी खा. नीलेश राणे यांना पुन्हा निवडणूकीत उतरविले जाईल असेही सांगितले जाते. त्याशिवाय कणकवली विधानसभा मतदार संघातून विद्यमान आ. नितेश राणे हे निवडणूक लढविणार हे निश्‍चित आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे पुन्हा निवडणूक लढविणार का याची उत्सुकता आहे. त्यांनी निवडणूक नाही लढविली तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष  सतीश सावंत व इतर काही नावांची चर्चा कुडाळ विधानसभा मतदार संघातून सुरू आहे. युवा नेते संजू परब यांचे नाव सावंतवाडीतून चर्चेत आहे. 

शिवसेना कोकण हा आपला बालेकिल्ला कायम राखण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. सध्याचे पालकमंत्री शिवसेनेेचे नेते दीपक केसरकर सावंतवाडीत तिसर्‍यांदा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे आणि कुडाळमध्ये अर्थातच सध्याचे आ. वैभव नाईक हे निवडणूक रिंगणात उतरणार हेही निश्‍चित आहे. एक एक दिवस आणि एक एक महिना जसा पुढे जाईल तसा निवडणूकपूर्व राजकारणाचा रंग अधिक स्पष्ट होत जाईल.