Wed, Jun 19, 2019 08:36होमपेज › Konkan › स्वाभिमान पक्ष, शिवसेना नाणार विरोधासाठी एकत्र

स्वाभिमान पक्ष, शिवसेना नाणार विरोधासाठी एकत्र

Published On: Oct 12 2018 1:03AM | Last Updated: Oct 12 2018 1:03AMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

नाणार येथे होणार्‍या बहुचर्चित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना व स्वाभिमान विरुद्ध भाजप यांच्यात घमासान पाहायला मिळाले. ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असे शिवसेना खा. विनायक राऊत, आ. नितेश राणे व स्वाभिमान सदस्यांनी सांगितले. तर भाजपच्या सदस्यांनी या भूमिकेस विरोध केला. अखेर शिवसेना व स्वाभिमान सदस्यांच्या नाणार प्रकल्पाविरोधी आक्रमक भूमिकेमुळे नाणार रद्दचा ठराव घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक गृह व वित्त राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, खा. विनायक राऊत, खा. नारायण राणे, आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक, आ. निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी तथा समिती सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, सदस्य सतीश सावंत, रणजित देसाई, काका कुडाळकर, सरोज परब, रोहिणी गावडे, अतुल काळसेकर, संजय पडते यासह अन्य सदस्य, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समिती निर्धारित वेळेत सुरू झाली. ही सभा तब्बल साडेआठ महिन्यांनी होत असल्याने विरोधी गटाचे सदस्य आक्रमक भूमिका घेवून सभेत घमासान होईल, असे वाटले होते. परिणामी सभागृहात व सभागृहाच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, सभा विलंबाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. मात्र, नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प, शिस्तभंग करणार्‍या सदस्याचे निलंबन, अभिनंदन प्रस्ताव, गेल्या बैठकीतील सदस्यांच्या सूचना न घेणे या विषयावरून सभागृहात गरमागरम चर्चा झाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तंग झाले होते.

खा. राणे म्हणाले, आपण सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गदारोळ करणार्‍या सदस्यांना एका वर्षाच्या कालावधीसाठी निलंबित करू, असे नियमबाह्य वक्तव्य करून सदस्यांचा अपमान केला आहे. तुम्ही सभा चालवायला समर्थ नाहीत का? तुमच्या या विधानामुळे सदस्यांच्या अवमानाबरोबरच राज्यात जिल्ह्याची बदनामी झाली आहे.  नियमानुसार तुम्हाला सदस्यांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही, असे सांगून राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना याबाबत खुलासा करण्याची सूचना केली.यावर पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीसाठीचे सभा चालवण्यासाठीच्या नियमांचे वाचन केले. यात एखाद्या सदस्यांने गैरवर्तन केल्यास त्याला निलंबित अथवा त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अहवाल पाठवण्याचा अधिकार अध्यक्ष या नात्याने मला असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

अभिनंदन ठरावावरून सुरुवातीलाच वाद

प्रशासनाने शोक प्रस्ताव सभागृहात सादर करण्याची सूचना स्वाभिमान सदस्य सतीश सावंत यांनी केली. दिवंगत झालेल्यांची यादी प्रशासनाकडे नसल्याचे सांगून यापुढे या सूचनेची नोंद घेण्यात येईल, असे सचिव तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले. तर सदस्य अभिनंदनाचे ठराव मांडायला सुरूवात केली तेव्हा नियमानुसार तसे ठराव घेता येत नाहीत असे पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. यावरून मित्रपक्ष भाजप व विरोधी पक्ष स्वाभिमान या दोघांनी एकत्र येत पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे काका कुडाळकर यांनी अभिनंदन ठराव नियमात बसत नसला तरी या सभेची एक परंपरा म्हणून ठराव घ्यावाच लागेल, असे सांगितले. तर स्वाभिमान सदस्य सतीश सावंत व रणजीत देसाई यांनी जिल्ह्यासाठी भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तींचे अभिनंदन हे व्हायलाच हवे असे सांगितले. अखेर अभिनंदन प्रस्ताव घेण्यात आले.

नाणार नकोच; सेना-स्वाभिमानचे एकमत

राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार्‍या ग्रीन रिफायनरी प्रकल्पास शिवसेना व स्वाभिमान पक्षाच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. खा. विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्प काही केल्या होवू देणार नसल्याचे सांगितले. तर हीच भूमिका  आमचीही असेल असे आ. नितेश राणे यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प होवू नये यासाठी येथील स्थानिक ग्रामपंचायतीमधून तसे ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवले आहेत असे खा. राऊत यांनी सांगितले. त्यामुळे कोकणवासीयांच्या जीवाशी खेळणारा प्रकल्प नकोच असे सेना आणि स्वाभिमान पक्षाच्या वतीने स्पष्ट करून तसा ठरावही घेण्यात आला. ही भूमिका राज्य व केंद्र शासनामार्फत पोचवा असेही यावेळी सांगितले. तर या ठरावास भाजप पक्षाच्या सदस्यांनी कडाडून विरोध करत सभागृहात गदारोळ करण्याचा प्रयत्न केला व सत्ताधारी पक्षाचे घटक असलेल्या मंत्री केसरकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नाणार प्रकल्प विरोधाचा ठराव शासनाकडे पाठविला जाईल. तसेच भाजप सदस्य अतुल काळसेकर, राजेंद्र म्हापसेकर व काका कुडाळकर व श्‍वेता कोरगावकर यांची नाणार बाबतची भूमिका त्यात  नमूद करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
एमटीडीसीचे अधिकारी खरोखरच आजारी आहेत का?

जिल्हा नियोजन समिती सभेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत प्राप्त 35 कोटी रूपये परत गेले हा विषय जोरदार गाजला. उपस्थित सर्वच सदस्यांनी या विषयावर अधिकार्‍यांना धारेवर धरले. स्वाभिमान सह भाजप सदस्यांनीही या विषयावर पालकमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या सभेला पर्यटनचे अधिकारी उपस्थित नव्हते. ते आजारी असून रुग्णालयात दाखल असल्याचे उपस्थित अधिकार्‍याने सांगितले. मात्र परत गेलेल्या 35 कोटी रुपयांचे उत्तर त्यांना देता येणार नसल्याने ते उपस्थित राहिले नाहीत असा आरोप करत  त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सदस्य सतीश सावंत यानी केली. या मागणीला मान्यता देत ते खरोखरच आजारी आहेत का याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री केसरकर यांनी दिले. दरम्यान उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक होत असून या स्मारकाची जबाबदारी ही पर्यटन अधिकार्‍यांकडून दुसर्‍या अधिकार्‍यांना देण्यात आली असल्याचेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

चांदा ते बांदा जि.प.सदस्यांनाही सामावूनन घ्या 

चांदा ते बांदा या योजनेंतर्गत जिल्ह्याला 67  कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी जिल्हा विकासासाठी वापरला जात आहे. या अंतर्गत शोभिवंत मत्स्य उत्पादन, कौशल्यविकास, एकात्मिक कुक्कुट विकास, आदी विविध योजनांवर खर्च केला जात असल्याचे पालकमंत्री दीपक केसकर यांनी स्पष्ट केले. या चांदा ते बांदा या योजनेसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी वापरता ,वर ही

योजना जिल्हा परिषदेमार्फतच चालते असे सांगता, पण आम्हा जिल्हापरिषद सदस्यांना मात्र या योजनेत कोणत्याही प्रकारे विश्‍वासात घेत नाहीत. आमचे अधिकारी तुम्हाला चालतात, पण आम्ही चालत नाही असा आरोप सदस्य सतीश सावंत यांनी करताना चांदा ते बांदा ही योजना जिल्ह्याच्या विकासासाठीच आहे ना? मग यात आमचा सहभाग का नाही? असा सवालही करत आम्हालाही या योजनेत सामावून घ्यावे अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी उमेदवारांच्या परीक्षा आणि मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. त्या तात्काळ द्याव्यात, अशी मागणीही सतीश सावंत यांनी लावून धराली. या विषयावरूनही सभागृहात काही काळ गदारोळ उडाला होता.

तलाठी जाग्यावर नाहीत...जनता हवालदिल

सात व बारा संगणकीकरणाच्या नावावर जिल्ह्यातील सर्व तलाठी मुख्यालयात असतात. हे काम अद्यापही अपूर्ण आहेत. हे संगणकीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हे सातबारा ऑफलाइन द्यावेत अशी मागणी केली होती. त्याचबरोबर हे संगणकीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत आठवड्यातील दोन दिवस तलाठ्यांनी आपल्या गावांत उपस्थित राहावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे आपण आदेशही दिले होते. परंतु अद्याप तलाठी कार्यालयात मिळत नाहीत. त्यामुळे लोकांचे खूप हाल झाले आहेत. लोकांची कामे होत नाहीत. लोकांचे दोन दोन वर्ष वारस तपास आदी कामे रखडून राहिली आहेत. त्यामुळे यावर काय तो निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी सतीश सवंत यानी केली. या मागणीला सर्वच सदस्यांनी उचलून धरले.