Thu, Jun 04, 2020 01:52होमपेज › Konkan › आचरा संस्थानात रंगले शिवलग्‍न

आचरा संस्थानात रंगले शिवलग्‍न

Last Updated: Oct 09 2019 10:44PM
आचरा : वार्ताहर

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आचरा येथील संस्थानी थाटासाठी प्रसिद्ध असणार्‍या इनामदार श्री देव रामेश्‍वर संस्थानच्या दसरोत्सवाची शाही थाटात मंगळवारी सांगता झाली. सायंकाळी तोफाच्या व बंदुकीच्या आतषबाजी नंतर श्री देव रामेश्‍वराचे तरंग महालदार, चोपदार, अब्दागीर, निशाण,व बारा-पाच मानकरी,भाविक व शाही लवाजम्यासह श्री देवी फुरसाई मंदिर येते शिवलग्‍न सोहळ्यासाठी गेले. शिवलग्‍न कार्यक्रमानंतर हजारो भाविकांनी सोन्याचे प्रतीक मानलेल्या आपट्याची पाने सोने म्हणून लुटली.

श्री देव रामेश्‍वराच्या शाही दसरोत्वास मुंबई, कराड, गोवा, बेळगाव, पुणे, गोकर्ण येथून आचरा गावचे मूळ रहिवासी दाखल झाले होते. श्री देव रामेश्‍वराची पिंडी यावेळी पंचमुखी महादेवाच्या रुपात सजविण्यात आली होती. ‘श्री’ चे हे अनोखे रूप पाहण्याचा दुर्मीळ आनंद लुटण्यासाठी रामेश्‍वर मंदिरात भाविकांची रीघ लागली होती.

आचरा गावच्या माहेरवाशिणी फुरसाई देवीची खणा नारळाने ओटी भरण्यास दाखल झाल्या होत्या. सकाळपासून श्री देव रामेश्‍वराचे दर्शन घेऊन माहेरवाशिणी श्री फुरसाई देवी मंदिराकडे ओट्या भरण्यासाठी जात होत्या. महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. या शाही दसरोत्सव कार्यक्रमास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.