Mon, Sep 16, 2019 06:25होमपेज › Konkan › गीते-तटकरेंमध्ये काँटे की टक्‍कर

गीते-तटकरेंमध्ये काँटे की टक्‍कर

Published On: Mar 15 2019 1:45AM | Last Updated: Mar 15 2019 1:45AM
मंडणगड : विनोद पवाद

रायगड लोकसभा मतदार संघात आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार राज्याचे माजी अर्थमंत्री सुनील तटकरे व युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यात लढत होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकलेले दोन्ही बलाढ्य उमेदवार आता सेकंड इनिंगमध्ये उतरले आहेत.त्यामुळे ही निवडणूक खर्‍या अर्थाने तुल्यबळ अशीच राहील. 

या ‘काँटे की टक्‍कर’मध्ये मंडणगड तालुक्यात राष्ट्रवादीचे आ. संजय कदम यांचा कस लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतून विधानसभा निवडणुकीचा कल उलगडणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये जेमतेम दोन हजारांच्या फरकाने पराभूत झालेले तटकरे हे पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. पाच वर्षांच्या कालावधीमध्ये  मतदारसंघात जोरदार तयारी त्यांनी केली. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी तितकीच मजबूत मानली जाते. त्यामुळे ‘काँटे की टक्कर’ अशी स्थिती असणार्‍या रायगड मतदार संघाची एकूणच निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

मतदार संघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत. शेकाप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी तटकरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. आत्ताच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तटकरे यांनी पाच वर्षांपासूनच रणनीती आखायला सुरुवात केली होती. तटकरे यांनी विविध राजकीय डावपेच आखत स्वपक्षीय, इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची देखील मोट बांधल्याचे बोलले जाते. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे तीन व शेकापचे दोन आमदार यांची ताकद तटकरे यांना मिळू शकते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तटकरे बाजी मारतील, अशी शक्यता असली तरी लढत मात्र सोपी नाही. 

उलटअर्थी सलग सातव्यांदा लोकसभेवर जाण्याची संधी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमोर आहे.परंतु त्यांना मात्र गटबाजीला सामोरे जावे लागणार आहे. कुणबी व्होट बँकेच्या आधारावर गीते सातत्याने विजयी होतात, असे म्हटले जाते. परंतु या व्होट बँकेचे वलय गीतेंच्या बाजूने दिसत नाही. ते काही पायाभूत प्रकल्प आणतील, रोजगार उपलब्ध होतील याबाबत कुणबी समाजाची अपेक्षा फोल ठरली असल्याचे बोलले जाते. 

अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर असे सहा विधानसभा मतदार संघ मिळून विस्तीर्ण असा रायगड लोकसभा मतदार संघ तयार झाला आहे.गुहागरपासून अलिबागपर्यंत शिवसेनचे खोलवर असलेले जाळे आहे, शिवसेनेचे मजबूत संघटन ही गीतेंची जमेची बाजू म्हणता येईल. शिवाय मागील निवडणुकीत गीते यांना अंतर्गत बंडाळीचा फटका बसला होता. यावेळी मात्र अंतर्गत बंडाळीचे आव्हान गीते यांच्यासमोर नसणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन दापोली, मंडणगड, खेडमधून सेनेचे प्राबल्य वाढवण्याकरिता गीते यांना मोठे मताधिक्य देण्याची तयारी रामदास कदम यांनी केली आहे. कुणबी समाजाची मते गीतेंनाच जातात. आता भाजपचे मताधिक्य कोणाच्या पारड्यात जाणार? हे  आगामी काळातच समजू शकेल.

आ. संजय कदमांसाठी निवडणूक महत्त्वाची

मंडणगड तालुक्याचा विचार करता मंडणगडमध्ये सेनेचे वर्चस्व आहे. मात्र, आ. संजय कदम यांच्या माध्यमातून तटकरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक आ. संजय कदम यांच्यासाठीही महत्त्वाची आहे. विधानसभेचे चित्र या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.