Sat, Sep 21, 2019 06:39होमपेज › Konkan › जिल्ह्यात पावणेदोन लाख अल्पभूधारक

जिल्ह्यात पावणेदोन लाख अल्पभूधारक

Published On: Feb 19 2019 1:14AM | Last Updated: Feb 18 2019 10:37PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकर्‍यांची नोंद महसूल यंत्रणेकडून केली जात आहे. जिल्ह्यात आतापयर्र्ंत 1 लाख 75 हजार 410 अल्पभूधारक शेतकर्‍यांची नोंद महसूल विभागाने केली असून, शेतकर्‍यांनी तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक यांच्याकडील याद्या पडताळून आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे. 

पाच एकरपेक्षा कमी जमीन क्षेत्र असलेल्या कुटुंबाला प्रतिवर्षी सहा हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. अल्पभूधारक शेतकर्‍यांनी नाव, गाव, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदीची माहिती भरुन स्वयंघोषणापत्र तलाठी व ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांच्याकडे जमा करायचे आहे. आधारकार्ड किंवा मतदान कार्ड व बचतखात्याचे पासबुक झेरॉक्स यासोबत जोडायची आहे.

सध्या जिल्ह्यात गावनिहाय अल्पभूधारक खातेदारांची यादी तयार करण्याचेे काम सुरु आहे. ही यादी ग्रामसभेपुढे ठेवली जाणार आहे. त्यानंतर कुटुंबनिहाय वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानंतर शेतकरी कुटुंबाची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध करुन त्यावर हरकती मागवल्या जाणार आहेत. यादीत दुरुस्ती करुन ती तहसीलदारांकडे अंतिम करण्यासाठी पाठवली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व याद्या पुणे येथील राज्य कृषि विभागाच्या कार्यालयात पाठवल्या जाणार आहेत. तेथून केंद्र शासनाकडे या याद्या पाठवल्या जातील, असे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यकांकडून हे काम सुरु करण्यात आलेले आहे. काही गावांमध्ये यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे  आयोजनही होऊ लागले आहे. याद्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 1 लाख 75 हजार 410 शेतकर्‍यांची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. मुंबई किंवा बाहेर गावी असलेले, गावात असणार्‍याही अनेक सह:हिस्सेदारांची नोंद झालेली नाही. ही यादी अपडेट करण्याचे काम सुरु झाले असून, आणखी नावे वाढणार आहेत.

तालुका    संख्या
मंडणगड    15,201
दापोली    20,425
खेड       19,490
चिपळूण    27,941
गुहागर    20,484
संगमेश्‍वर    11,377
रत्नागिरी    23,135
लांजा      21,409
राजापूर    15,948
एकूण        1,75,410