Thu, May 23, 2019 23:03होमपेज › Konkan › जिल्ह्यात मोसमी पावसाची विश्रांती

जिल्ह्यात मोसमी पावसाची विश्रांती

Published On: Jun 13 2018 10:32PM | Last Updated: Jun 13 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

बिगर मोसमीची समाधानकारक वाटचाल झाल्यानतर मोसमी पावसाने दाखविलेल्या सक्रियतेत अडथळे निर्माण झाले आहेत.  कोकणात सक्रिय झालेला मान्सून गेले दोन दिवस थबकला आहे.  गेले दोन दिवस पावसाने पाठ फिरविल्याने आता कोकणातील शेतकर्‍यांच्या खरिपाच्या  वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज चुकवीत गेल्या रविवारी सक्रिय झालेला मान्सून गेले दोन दिवस ओसरला आहे.  मंगळवारी जिल्ह्यात केवळ 3. 78 मि. मी.च्या सरासरीने 34 मि. मी. एकूण पाऊस झाला. गतवर्षी याच दिवशी  जिल्ह्यात 60 . मि. मी.च्या सरासरीने साडेपाचशे मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, गतवर्षी याच दिवशी झालेल्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी   आतापर्यंत झालेला पाऊस सरस ठरला आहे. गतवर्षी 13 जूनला जिल्ह्यात पावसाने 305 मि. मी. ची सरासरी गाठली होती. यावर्षी आतापर्यंत पावसाने 410 मि. मी.ची सरासरी गाठली आहे. 

बुधवारी जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्याचा अपवाद वगळता सर्व तालुके एक अंकी पर्जन्यमानाने नोंदविले होते. रत्नागिरी तालुक्यात बुधवारी दिवसभरात केवळ 10 मि. मी.  पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच दिवशी सर्वच तालुक्यात 60 मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाला होता. दरम्यान  पावसामुळे काही भागात पडझड झाल्याच्या तुरळक घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात पूर्णगड येथे एका म्हैशीचा विजेचा धक्‍का बसल्याने मृत्यू झाला.