Thu, May 23, 2019 22:21
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › भाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jun 13 2018 10:32PM | Last Updated: Jun 13 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरानजीकच्या भाट्ये पुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. ही घटना बुधवार, 13 जून रोजी दुपारी घडली. त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे कळू शकले नाही.

सचिन तुकाराम घाग (वय 33, रा. राजिवडा, रत्नसागर अपार्टमेंट, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी 2.30 वा. सुमारास त्याने भाट्ये पुलावरून समुद्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाट्ये पुलावरून मासेमारी करणार्‍या काही तरुणांनी आणि तेथील स्थानिक मच्छीमारांनी  सचिनला समुद्रात उडी मारताना पाहिले. सचिनने समुद्रात उडी मारताच त्यांनीही त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. तर काही मच्छीमारांनी आपल्या होड्या समुद्रात नेऊन त्याला किनारी आणले. 

दरम्यान, एका तरुणाने समुद्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. ही माहिती तेथील नगरसेविका अस्मिता चवंडे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सचिनला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सचिनची प्रकृती स्थिर आहे.