Wed, Jun 19, 2019 09:21होमपेज › Konkan › डायल 108 ठरतेय जीवनदायी!

डायल 108 ठरतेय जीवनदायी!

Published On: Oct 12 2018 1:03AM | Last Updated: Oct 12 2018 1:03AMरत्नागिरी : प्रतिनिधी

राज्य सरकारने आरोग्य कवच योजनेंतर्गत जनतेला 108 ही आधुनिक सोयीसुविधांनी युक्त रुग्णवाहिका सेवा प्रदान केली आहे. या रुग्णवाहिका सेवेने गेल्या पाच वर्षांमध्ये 53 हजार 568 अत्यवस्थ रुग्णांना सेवा दिली आहे. यामध्ये 9 हजार 825 गरोदर महिलांना याचा लाभ झाला आहे.

आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये ‘108’ ही रुग्णवाहिकेची सेवा मोडते. यामध्ये रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, मनुष्यनिर्मित आपत्ती व अत्यवस्थ रूग्ण, गरोदर माता व गंभीर बालके यांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ही रूग्णवाहिका सेवा आहे. ‘108’ या क्रमांकावर कोणत्याही नेटवर्कवरून दूरध्वनी केल्यास नजीक उपलब्ध असलेली या सेवेतील रूग्णवाहिका तात्काळ उपलब्ध केली जाते. 

आतापर्यंत 108 रुग्णवाहिकने रस्ते अपघातांमध्ये 4322 रुग्ण, हल्ल्याचे 222 रुग्ण, जळाल्याचे 401 रुग्ण, गरोदर माता 9825, हृदयविकाराचे 175, पडल्याचे 1469, नशा आणि विषबाधेचे 2024 रुग्ण, विजेचा झटका बसलेले 39, वस्तुमान अपघाताचे 715, वैद्यकीय उपचाराचे 30371, बहुघातक अपघाताचे 100, आत्महत्येचा प्रयत्न केलेले 85 यासह इतर 3800 रूग्णांना ही सेवा मिळाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात या सवेचे समन्वयक म्हणून डॉ. विवेक कामत काम पाहत आहेत.

जिल्ह्या सध्या 17 रुग्णवाहिका सध्या जिल्ह्यात उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणारी अत्याधुनिक यंत्रणा पुरवण्यात आली आहे. रुग्णवाहिकेसोबत एक डॉक्टरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतीअत्याधुनिक सेवा असलेल्या 4 तर इतर वैद्यकीय सेवा असलेल्या 13 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. 

जिल्हा शासकीय रुग्णालयासह मंडणगड ग्रामीण रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय, मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालय, देवरूख ग्रामीण रुग्णालय आणि पावस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. तर रायपाटण ग्रामीण रुग्णालय, खेड पोलिस दूरक्षेत्र, लोटे प्राथमिक आरोग्य केंद्र, चिपळूण बहादूर शेख नाका कार्यालय, लांजा ग्रामीण रुग्णालय, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या परिसरात अत्यवस्थ रुग्ण असल्यास या रुग्णवाहिकांमार्फत त्यांना संबंधित रुग्णालयात दाखल केले जाते.