होमपेज › Konkan › जनतेला आपल्या खासदारकीचा अभिमानच : गीते

जनतेला आपल्या खासदारकीचा अभिमानच : गीते

Published On: Jan 17 2019 11:44PM | Last Updated: Jan 17 2019 11:23PM
चिपळूण : प्रमोद पेडणेकर

गेली सहा टर्म आपण रत्नागिरी व रायगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जात आहोत. खासदार व मंत्री म्हणून या मतदारसंघाला शंभर टक्के न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. येथील जनतेच्या सुख-दु:खाशी आपण बांधील राहिलो. मतदारांना वेदना, क्लेष होईल अशा घटनांपासून आपण दूर राहिलो. या जिल्ह्याना मोठी संसदीय परंपरा आहे. ती आपण जपली. सातव्यांदाही आपलाच विजय निश्‍चित असल्याचा निर्वाळा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

रत्नागिरी, रायगडचा खासदार म्हणून आपण सातत्याने जनतेमध्ये राहिलो आहे. खासदार म्हणून विकास निधी शंभर टक्के खर्च करणे हा विक्रम आपल्याच नावावर आहे. याशिवाय या जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न आपण निश्‍चित केला आहे. लोकसभेत व मतदारसंघातही रायगड, रत्नागिरीच्या जनतेला अभिमान वाटेल असंच आपण योगदान दिले 

आहे. लोकसभेमध्ये एक मंत्री म्हणून वा खासदार म्हणून विविध चर्चेमध्ये आपला सातत्याने सहभाग व ठसा उठून दिसला आहे. याचा या दोन्ही जिल्ह्यातील जनतेला आनंद आहे. मतदारसंघात फिरताना सामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी उत्साहवर्धक असल्याचे गीते यांनी सांगितले.

येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी यापूर्वी जनतेने नाकारलेले विजयाच्या वल्गना करीत आहेत. आभास निर्माण करणारी राजकीय गणिते मांडली जात आहेत. एकमेकांना पाण्यात पाहणारे माझ्या पराभवासाठी गळाभेट करीत आहेत. पण मागचीच गणिते पुढील निवडणुकीला कायम राहतात असे नव्हे. मागच्यावेळी आपला निसटता झालेला विजय यावेळी मोठ्या मताधिक्क्यात होईल. काही प्रमाणात अंतर्गत नाराजीचा फटका माझ्या मताधिक्क्याला झाला होता. परंतु यावेळी शिवसैनिक, पदाधिकारी व नेते एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शिवाय रायगड हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असून यावेळीही तो अभेद्य राहील. या मतदारसंघावरील भगवा कदापि खाली उतरणार नाही. उलट स्वत:च्या विजयाची स्वप्न पाहणार्‍यांनी आपल्याच घरात पेटलेल्या असंतोषाच्या वातींची दखल घ्यावी. आपण स्वत:च्या राजकीय उत्कर्षासाठी व घराण्यासाठी राजकारणात आलो नाही, तर जनतेच्या वेदना समजण्यासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत असल्याचे सांगून गीते पुढे म्हणाले की, माझ्या पराभवाची स्वप्न बघणार्‍यांनी वेळोवेळी राजकीय सौदेबाजी केली. प्रसंगी अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसले आहेत हा इतिहास आहे. त्यामुळे विजयाची स्वप्ने जरूर पहा. परंतु हेच सर्वजण तुमच्याच पराभवाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाले आहेत याची नोंद घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

जनतेचा विश्‍वास आपल्यासोबत

तेवीस वर्षांच्या संसदीय राजकारणाच्या वाटचालीत आपणावर कधी बेहिशोबी मालमत्ता उभी केल्याचा व भ्रष्टाचाराचा आरोप शिवलेलाही नाही. रायगडच्या जनतेला ही अभिमानास्पद बाब आहे. जनतेचा विश्‍वास आपल्यासोबत आहे. आगामी निवडणुकीत मतदान करताना जनता नक्कीच तुलनात्मक विचार करुन निर्णय घेणार आहे. या मतदारसंघामध्ये आपण केलेले काम व ठेवलेला लोकसंपर्क, जपलेली संसदीय परंपरा व प्रतिमा याचा कौल आपल्याच बाजूने जनता देईल, असा विश्‍वास गीतेंनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.