मच्छीमारांच्या अवस्थेस शिवसेनाच जबाबदार : आ.राणे | पुढारी 
Wed, Aug 22, 2018 08:13



होमपेज › Konkan › मच्छीमारांच्या अवस्थेस शिवसेनाच जबाबदार : आ.राणे

मच्छीमारांच्या अवस्थेस शिवसेनाच जबाबदार : आ.राणे

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:15AM



कणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गच्या मच्छिमारांची आजची अवस्था आणि दुर्दशा शिवसेनेच्या आमदार, पालकमंत्री आणि खासदार यांच्यामुळेच झाली असून ती चीड निर्माण करणारी आहे. ज्या किनारपट्टींच्या मतांमुळे शिवसेनेचे आमदार आणि खासदार 2014 च्या निवडणुकीत निवडून आले त्याच मच्छिमारांवर पोलिसांची दडपशाही वाढत चालली आहे. त्यामुळे या मच्छिमारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप आ.नितेश राणे यांनी केला. 

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. नितेश राणे म्हणतात, ज्या सहाय्यक मत्स्यायुक्त श्री. वस्त यांची बदली करण्याचे श्रेय आ.वैभव नाईक घेत आहेत त्याच वस्त यांना पाठीशी घालण्याचे काम आमच्या मच्छिमारांच्या बरोबरीच्या आंदोलनावेळी याच आ.वैभव नाईक आणि त्यांच्या पालकमंत्र्यांनी केले होते. तेव्हा जवळचा वाटणारा अधिकारी वस्त आज शत्रू कसा झाला? याचे उत्तर आ.वैभव नाईक यांनी जनतेला द्यावे. शिवसेना सहभागी असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारने एलईडी फिशिंगबद्दल एवढे कडक कायदे केल्यानंतरही आज राजरोस पध्दतीने मालवण किनारपट्टीवर एलईडी फिशिंग होतेच कशी? याचे उत्तरही शिवसेना नेते मंडळींनी द्यावे. पर्ससीनेट मच्छिमारी करणार्‍या परजिल्ह्यातील आणि परराज्यातील मच्छिमारांवर कोणताही धाक किंवा भीती नसल्याने अशा पध्दतीच्या घटना कायद्याच्या विरोधात जावून आजही सुर आहेत. 

किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छिमारांना स्थानिक प्रशासन व स्थानिक शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून कोणतेही संरक्षण किंवा आधार मिळत नसल्यानेच आज ही मच्छिमारांची अवस्था झाली आहे. या सर्व घटना होत असताना आ.नाईक यांना खरोखरच आमच्या मच्छिमारांबद्दल थोडी जरी आस्था किंवा प्रेम असेल तर ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करून मच्छिमारांबद्दलचे प्रेम सिध्द करावे, असे आव्हान आ. राणे यांनी दिले.