होमपेज › Konkan › महामार्ग चौपदरीकरण कंत्राटदाराच्या प्लॅन्टची अज्ञातांकडून तोडफोड

महामार्ग चौपदरीकरण कंत्राटदाराच्या प्लॅन्टची अज्ञातांकडून तोडफोड

Published On: Nov 15 2017 1:48AM | Last Updated: Nov 14 2017 11:36PM

बुकमार्क करा

नांदगाव : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी उभारण्यात आलेल्या के.सी.सी. बिल्डकॉन (हरियाणा) या कंपनीच्या कासार्डे येथील प्लॅन्टवर सोमवारी रात्री अज्ञातांनी हल्ला करून तोडफोड केली. याप्रकरणी कणकवली पोलिस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या खारेपाटण-संभाजीनगर ते कलमठ या टप्प्याचे काम के. सी. सी. बिल्डकॉन (हरियाणा) या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच संभाजीनगर ते कलमठ या टप्प्यामध्ये येत असलेल्या कासार्डे येथे या कंपनीने रस्ता बनविण्यासाठी लागणारी सर्वच यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली. हे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या कासार्डे-जांभळगाव व ब्राह्मणवाडी येथील माळरानावर जेसीबीच्या सहाय्याने वाढलेले गवत व महामार्गासाठी हस्तांतरीत करण्यात आलेल्या जमिनीमध्ये काम सुरु करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री 9 वा. च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञांतानी दमदाटी करत येथील मॅनेजर कुठे आहे? अशी विचारणा करत सुरक्षा रक्षकाकडील चार्जिंग लाईटच्या बॅटरी जबरदस्तीने काढून घेतल्या व फोडून टाकल्या. तसेच सुरक्षा रक्षकाच्या केबिनच्या काचा व खुर्च्यांचेही तोडफोड केली. काही ठिकाणी लावण्यात आलेले लाईटचे बल्ब व हॅलोजनचीही तोडफोड करत काळोख करून आणखी काही तोडफोड केली. त्यानंतर येथील तोडफोड झाल्यावर अज्ञातांनी  पळ काढला. मात्र अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे तेथील कर्मचार्‍यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबची तक्रार सुरक्षा रक्षक बापू सखाराम खरात यांनी कणकवली पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही तोडफोड कोणी व कशासाठी केली याचे कारण समजू शकले नाही.