Mon, Sep 16, 2019 11:41होमपेज › Konkan › गीते, राऊत, तटकरे v/s गीते, राऊत, तटकरे

गीते, राऊत, तटकरे v/s गीते, राऊत, तटकरे

Published On: Apr 05 2019 1:49AM | Last Updated: Apr 04 2019 10:35PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गंगाराम गीते यांच्या विरोधात अपक्ष म्हणून अनंत पद्मा गीते, राष्ट्रवादीचे सुनील दत्तात्रय तटकरे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे व अपक्ष सुनील पांडुरंग तटकरे तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेना खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध विनायक लवू राऊत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या नाव साधर्म्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.

लोकसभेच्या रायगड-रत्नागिरी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात चुरशीची लढत होईल, असे चित्र आहे. गतवेळी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा निसटता पराभव केला होता. या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये खरी लढत होणार आहे. त्यामुळे अनंत गीते यांच्या नावसाधर्म्याचा उमेदवार रिंगणात असल्याने त्यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधातही अपक्ष दोन सुनील तटकरे उभे ठाकले आहेत. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातही याचवेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात राजापूर तालुक्यातील विनायक लवू राऊत हे नाव साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. या मतदारसंघात माजी खासदार  निलेश राणे यांच्या सोबत विनायक राऊत यांची खरी लढत आहे.  त्यामुळे या निवडणुकीतही रंगत वाढणार आहे.

नाव साधर्म्याचा परिणाम काय?

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रायगड-रत्नागिरी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात सुनील तटकरे हे अपक्ष उमेदवार उभे राहिले होते. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तटकरे यांना 9,849 एवढी मते पडली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा 2,110 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे नावसाधर्म्याचा फटका किती बसू शकतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.