होमपेज › Konkan › नितेश राणे, कोळंबकरांवर कारवाई होणार : विखे - पाटील 

नितेश राणे, कोळंबकरांवर कारवाई होणार : विखे - पाटील 

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 16 2017 2:01AM

बुकमार्क करा





नागपूर : प्रतिनिधी

आ. नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली हे स्पष्ट आहे. माझे विरोधी पक्षनेतेपद गेले तरी बेहत्तर पण, या दोघांवर कारवाई केली जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी सांगितले. 

हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांशी ते सुयोग निवासस्थानी बोलत होते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद पोटनिवडणुकीत नितेश राणे व कालिदास कोळंबकर यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दोघांनीही प्रसिद्धी माध्यमांना तशी माहिती दिली होती. नितेश राणे यांनी तर काँग्रेसने कारवाई करून दाखवावी, असे आव्हान दिले होते. 

विधानभेत काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादीचे 41 सदस्य आहेत. या दोघांवर कारवाई केली तर काँग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा कमी होणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते. परंतु, विखे-पाटील म्हणाले, या दोघांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे स्पष्ट आहे.

 या प्रकरणी पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी आमदार शरद रणपिसे यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या दोघांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांच्या क्लीपही गोळा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोघांवर पक्ष निश्‍चितपणे कारवाई करेल. कारवाई करताना माझे विरोधीपक्षनेतेपद गेले तरी पक्षहितासाठी त्याचा विचार केला जाणार नाही, असेही विखे पाटील म्हणाले.