Mon, Jul 06, 2020 04:40होमपेज › Konkan › मुख्याधिकारी कक्षाला ठोकले टाळे

मुख्याधिकारी कक्षाला ठोकले टाळे

Published On: Dec 30 2017 12:47AM | Last Updated: Dec 29 2017 10:30PM

बुकमार्क करा
मंडणगड : प्रतिनिधी

मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हजर राहत नसल्याने अखेर येथील नगरसेवकांनी मुख्याधिकारी दालनाला टाळे ठोकले आणि याबाबत तहसीलदार प्रशांत पानवेकर यांना निवेदन दिले. मंडणगड न.पं.च्या आजच्या (दि. 29) सभेला प्रभारी मुख्याधिकारी हजर राहिले नाहीत. तसेच त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे संतप्‍त झालेल्या नगरसेवकांनी  मुख्याधिकारी दालनास टाळे ठोकले. मंडणगड नगरपंचायतीची प्रस्तावित विकासकामे व विविध विषयांवर चर्चा, निर्णय करण्यासाठी नगरसेवकांच्या विशेष सभा मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी आज आयोजित केली होती. या सभेस नगराध्यक्षा प्रियांका शिगवण, उपनराध्यक्ष राहुल कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे, सचिन बर्डे, शांताराम भेकत, कमलेश शिगवण, आदेश मर्चंडे, राजेश मर्चंडे, आरती तलार, नेत्रा शेरे, श्रद्धा लेंडे, श्रृती साळवी, स्वीकृत नगरसेवक मुंजीर दाभीळकर उपस्थित होते.

मुख्याधिकार्‍यांच्या सोयीची वेळ लक्षात घेऊन या सभेचे नियोजन केलेले असतानाही ते या सभेस उपस्थित न राहिल्याने नाराज झालेल्या नगराध्यक्षा, उपनराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी दालनास टाळे लावले. या संदर्भात उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे यांनी मुख्याधिकार्‍यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी सभेस उपस्थित राहण्यास असमर्थ असल्याचे सांगत आपणाविषयी वरिष्ठांकडे तक्रार करावी, असे सांगितल्याची माहिती उपनगराध्यक्ष कोकाटे यांनी पत्रकारांना दिली. 

मुख्याधिकार्‍यांअभावी कोणतेही कामे होत नसल्याने झाल्या प्रकाराने संतप्त झालेल्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी कार्यालयाला टाळे लावत असल्याची तक्रार व निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलच्या माध्यमातून पोहोच केले. या संदर्भात तहसीलदार प्रशांत पानेवकर यांची सभेस उपस्थित नगरसेवकांनी भेट घेऊन कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा, अशा मागणीचे निवेदन व टाळे लावून बंद केलेल्या कार्यालयाची चावी सुपूर्द केली. 

मुख्याधिकार्‍यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत नगरोत्थान योजनेतील 1 कोटी रुपयांची,  रस्ता अनुदान योजनेतील 40 लाखांच्या निधीचे विनियोगांच्या कामांचे निविदा प्रक्रियेवर मुख्याधिकार्‍यांच्या स्वाक्षरीनंतर कामकाज आज पूर्ण होणार होते. मात्र, सभाच न झाल्याने हे काम पुढे गेले असून मार्च महिन्याआधी हा निधी खर्च न केल्यास तो परत जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे. मुख्याधिकारी नसल्याने विविध शासकीय योजना, अनुदान यांचा निधी खर्ची पडलेला नाही.