Thu, May 23, 2019 23:23होमपेज › Konkan › मुसाड येथील डेंग्यूसद‍ृश आजाराने महिलेचा मृत्यू

मुसाड येथील डेंग्यूसद‍ृश आजाराने महिलेचा मृत्यू

Published On: Jun 13 2018 10:32PM | Last Updated: Jun 13 2018 10:32PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील मुसाड निर्मळवाडी येथील 34 वर्षीय महिलेचा डेंग्यूसद‍ृश आजाराने चिपळूण येथील एस.एम.एस. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अनिशा अंकुश निर्मळ (34)  असे महिलेचे नाव आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी केलेल्या रक्‍त तपासणी चाचण्यांमध्ये डेंग्यूचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला.  

या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यासह तालुक्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बुधवार, दि.13 रोजी जिल्हा व तालुकास्तरावरूनदेखील मुसाड निर्मळवाडी येथे वैद्यकीय पथके रवाना करण्यात आली आहेत. यासंदर्भात बोलताना तालुका आरोग्य अधिकारी जाधव यांनी सांगितले की, जोपर्यंत गावातील अन्य लोकांच्या रक्‍त नमुने तपासणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत निश्‍चित काही सांगता येणार नाही.  
खेड तालुक्यातील मुसाड निर्मळवाडी येथील अनिशा अंकुश निर्मळ (34) ही महिला गेले काही दिवस आजारी होती. स्थानिक उपचारांनीदेखील प्रकृतीत सुधारणा न झाल्याने कुटुंबियांनी तिला चिपळूण येथील एस.एम.एस. रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या करण्यात आलेल्या रक्‍त तपासणीत डेंग्यू या आजाराचा प्राथमिक अंदाज निघाल्याने रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी याबाबत तत्काळ जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेला कळवले.