Fri, Sep 20, 2019 22:09होमपेज › Konkan › शासनाकडून शेतकर्‍यांचा ‘सन्मान’

शासनाकडून शेतकर्‍यांचा ‘सन्मान’

Published On: Feb 25 2019 12:58AM | Last Updated: Feb 25 2019 12:58AM
रत्नागिरी : शहर वार्ताहर

शेती व्यवसायाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शासनाकडून शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

देशातील शेतकर्‍यांकरिता राबविण्यात येणार्‍या  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रविवारी देशभरात शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधल्या  गोरखपूर येथून या योजनेचा शुभारंभ केला. यानिमित्त जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे व मुख्य सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, गटविकास अधिकारी व्ही. एस. गमरे, कृषि विकास अधिकारी आरिफ शाह आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, शेतकर्‍यांना  उत्पन्न मिळण्याकरिता  केंद्र शासनाने  प्रधानमंत्री किसान  सन्मान निधी योजना सुरु केलेली आहे. या योजनेतंर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. या लाभाची रक्‍कम थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम देण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील नद्या बारमाही असल्याने त्याचा उपयोग सिंचनासाठी होवू शकतो. त्यामुळे शेतीबरोबरच फळपिक लागवडीचा उद्योगही कोकणात फायदेशीर ठरणारा आहे. आजच्या युवकांनी केवळ शहरात नोकरी करण्याचे उद्दिष्ट न बाळगता शेती व्यवसाय करणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 

जिल्ह्यात आतापर्यंत 82 हजार 828 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून त्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात आली आहे.  याप्रसंगी  पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे तसेच उत्तरप्रदेशात गोरखपूरमध्ये झालेल्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण कार्यक्रम स्थळी दाखविण्यात आले. 

कार्यक्रमप्रसंगी 1 ते 5 मार्च 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याच्या हस्ते करण्यात आले.  प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले. यावेळी दहा लाभार्थी शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाला शेतकरी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.