Mon, Jul 06, 2020 03:36होमपेज › Konkan › मित्र बुडाल्याचे त्यांनी कुणाला सांगितलेच नाही!

मित्र बुडाल्याचे त्यांनी कुणाला सांगितलेच नाही!

Published On: May 16 2019 2:06AM | Last Updated: May 15 2019 10:45PM
कणकवली : प्रतिनिधी

उन्हाळी सुटट्ी असल्याने ते सर्व मित्र करंजे येथील बंधार्‍यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, या बाबत त्यांच्या घरच्यांना काहीच माहित नव्हते. दरम्यान, बंधार्‍याच्या डोहात आंघोळी करत असताना एक मित्र बुडाला. यामुळे अन्य मित्र घाबरुन गेले. त्यांनी तडक घर गाठले. मात्र, आपल्याला सर्वजण ओरडतील या भीतीपोटी मित्र बुडल्याची माहिती त्यांनी कुणालाच सांगितली नाही. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर या दुर्दैवी घटनेमागील सत्य परिस्थिती उघडकीस आली.  

करंजे येथील उगवाई नदीपात्रात मंगळवारी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. दिवसभर शोध घेऊनही त्याची ओळख पटली नव्हती. अखेर बुधवारी या मृतदेहाची ओळख पटली, तो मृतदेह हुंबरट-गुरववाडी येथील अजय विजय गुरव (17) या शाळकरी मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सोमवारी दुपारी मित्रांसमवेत तो आंघोळीसाठी करंजेतील नदीत आला होता. आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना तो बुडाला. मात्र, त्याला बुडताना पाहून त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी तेथून धूम ठोकली. घराकडे जाऊन त्याची माहिती कोणाला दिली नाही. सायंकाळी मुलगा घरी आला नाही हे पाहून पालकांनी शोधाशोध केली. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, मंगळवारी सकाळी करंजे नदीपात्रात एका अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र ,त्याची ओळख पटली नव्हती. जवळच्या गणपती साण्यावर पँट आणि टीशर्ट काढून ठेवले होते. तो अंडरवेअरवर आंघोळीसाठी नदीत उतरला होता. मात्र, त्याची ओळख पटण्याएवढे कोणतेही पुरावे नव्हते. पोलिसांनी करंजे, हरकुळ परिसरात चौकशी केली होती. मात्र काहीच सुराग लागला नव्हता. मंगळवारी सायंकाळी ज्यावेळी प्रसारमाध्यमातून अनोळखी मृतदेह आढळल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी कणकवली पोलिसांशी रात्री संपर्क साधला. मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह अजय विजय गुरव याचा असल्याचे स्पष्ट झाले. 

मित्रांनी ते घाबरल्याने घराकडे जाऊन याबाबतची माहिती कुणाला दिली नव्हती. मात्र, नंतर पोलिस चौकशीत हा सारा प्रकार उघड झाला. अजय गुरव याने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. अजयच्या आकस्मिक मृत्यूने गुरव कुटुंबियांवर आपत्ती कोसळली आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.